तिकीट कापल्याने BJP मध्ये नाराजी?:गोपाळ शेट्टी नाराज, देवेंद्र फडणवीसांनी घेतली भेट; पूनम महाजनांचाही पत्ता कट होणार?…

Spread the love

मुंबई- भाजपने लोकसभा निवडणुकीची उमेदवारी कापल्यामुळे उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी नाराज झालेत. यामुळे मुंबई भाजपमध्ये एकच खळबळ माजली आहे. शेट्टी नाराज झाल्याची बातमी कळताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. या भेटीत फडणवीस यांनी गोपाळ शेट्टी यांचा योग्य तो सन्मान राखण्याचा शब्द दिल्याची माहिती आहे. दरम्यान, भाजप उत्तर मध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांच्या जागी नवा चेहरा देण्याची शक्यता असल्याचीही माहिती आहे.

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी जारी केली. त्यात महाराष्ट्रातील 20 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. यात उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांची उमेदवारी कापण्यात आली आहे. त्यांच्या नाराजीचे वृत्त कळताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बोरिवली येथील निवासस्थानी धाव घेतली. तिथे त्यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी फडणवीस यांनी शेट्टी यांना त्यांचा योग्य तो सन्मान राखण्याचा शब्द दिला. त्यानंतर शेट्टी यांनीही त्यांना योग्य ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

पूनम महाजन यांचाही पत्ता कट होणार?…

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खालोखाल सर्वाधिक मताधिक्य भाजपला या मतदार संघात मिळाले होते. 2014 च्या निवडणुकीत भाजपने राम नाईक याचे तिकीट कापत तत्कालीन आमदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी काँग्रेसचे तत्कालीन खासदार संजय निरुपम यांना पराभवाचा झटका देत विजय मिळवला होता. पण आता भाजपने गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापत या मतदार संघातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपने गोपाळ शेट्टी यांच्यासह ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांचेही तिकीट कापले आहे. त्यानंतर आता तिसऱ्या यादीत उत्तर मध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांच्या जागी नवा उमेदवार देण्यात येईल असा दावा केला जात आहे. पूनम महाजन यांच्या मतदार संघात विधानसभेच्या 6 जागा आहेत. त्यात आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम मतदार संघाचाही समावेश आहे. त्यांनी दोन्ही निवडणुकांत 25 हजारांहून अधिक मतकांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे या मतदार संघातून आशिष शेलार यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

काँग्रेसची राज बब्बर यांना उमेदवारी?…

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ 2004 ते 2014 पर्यंत काँग्रेसच्या ताब्यात होता. 2004 मध्ये येथून एकनाथ गायकवाड लोकसभेवर गेले होते. त्यानंतर 2009 च्या निवडणुकीत प्रिया दत्त यांचा विजय झाला होता. पण 2014 च्या निवडणुकीत प्रिया दत्त यांना पूनम महाजन यांच्या विरोधात पराभवाची चव चाखावी लागली होती. आता काँग्रेसने या मतदार संघातून राज बब्बर यांना मैदानात उतरवण्याचे संकेत दिलेत. अभिनेते राज बब्बर यांनी 2008 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2009 मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले होते. 2014 मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधून भाजपच्या व्ही पी सिंह यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीतही ते पराभूत झाले होते. पण भाजपच्या राजकुमार चाहर यांनी त्यांचा 95 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page