काही आठवड्यांपूर्वीच या कटुआ भागात अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात आला होता. परंतू दोन्ही बाजूंनी लष्करी वाहनांवर ग्रेनेड फेकण्यात आले. यानंतर दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. लष्कराकडून प्रत्युत्तरादाखल गोळीबार होताच हे अतिरेकी जवळच्या जंगलात पळून गेले.
जम्मूच्या कठूआत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते. त्यांचे पार्थिव मंगळवारी सायंकाळी डेहराडून एअरपोर्टला आणण्यात आली आहे. येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या अतिरेकी हल्ल्यात रुद्रप्रयागचे नायब सुभेदार आनंद सिंह, लॅंसडॉन येथील हवालदार कमल सिंह, टीहरी गढवालचे नायक विनोद सिंह, रिखणीखालचे रायफल मॅन अनुज नेगी आणि टीहरीच्या थाती दांगलचे रायफल मॅन आदर्श नेगी असे पाच जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर सरकारने अतिरेक्यांविरोधात कोणतीही प्रती कारवाई करण्याचा प्रस्ताव आणला तर आम्ही सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असे विरोधी पक्ष कॉंग्रेसने म्हटले आहे.
देहराडून विमानतळावर ही शहीदांची पार्थिवं आल्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शहीदांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहीली आहे. यावेळी त्यांनी जवानांच्या बलिदानाने देशाचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. जम्मूत अतिरेक्यांना भारतीय सैन्यांवर केलेला हल्ला अत्यंत भ्याड आहे. त्याचा आम्ही कठोर शब्दात निषेध करतो, या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. या हल्ल्याचे उत्तर देश नक्की देईल असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.कठुआत सैन्यावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात उत्तराखंडातील पाच जवान शहीद झाल्याचे वृत्त आल्यानंतर संपूर्ण राज्यात दु:खाची लाट पसरली आहे. या जवानांच्या कुटुंबियांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी दिले आहे.
दोन महिन्यांपूर्वीच मोठी घुसखोरी
कटुआ येथील लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात दहशतवादी घुसल्याचे समोर आले आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी ही घुसखोरी झाली होती. कठुआच्या माचेडी भागात दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर ग्रेनेड फेकल्याने यात पाच जवान शहीद झाले. तर अन्य पाच जवान जखमी झाले आहेत. त्यानंतर सैन्याने मोठे कोबिंग ऑपरेशन राबवित दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांचा संपूर्ण गट सामील होता. हा दहशतवादी हल्ला नॉर्दर्न आणि वेस्टर्न कमांडमधील इंटरफॉर्मेशन सीमेजवळ झाला.
कसा झाला हल्ला
सोमवारी रात्री उशिरापर्यंत भारतीय सैन्य दलाशी दहशतवाद्यांची चकमक सुरू होती. विशेष दलाचे जवान देखील मंगळवारी या कारवाईत सामील झाले. कठुआच्या एका बाजूला पाकिस्तानची सीमा आहे तर दुसऱ्या बाजूला पंजाब आणि हिमाचल प्रदेश आहे. हे ठिकाण उधमपूर, दोडा आणि सांबा जिल्ह्यांना लागून आहे. कठुआपासून 150 किमी अंतरावर असलेल्या बदनोटा गावात हा दहशतवादी हल्ला झाला आहे. माशेडी आणि लोहाई मल्हार यांच्यामध्ये हे गाव आहे. माशेडी येथे लष्कराचा तळ आहे. मात्र, दहशतवादी जवळच्या जिल्ह्यांमध्ये सरकत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना त्या दिशेने रवाना केले आहे.