मुंबई- महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. निकाल नेमका काय लागेल? ते उद्या स्पष्ट होईलच. पण सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात पडद्यामागे जोरदार घडामोडी घडत असल्याची माहिती मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांची भेट होत आहे. लोकसभेच्या निकालाआधीची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला मोलाची मदत केली. विशेषत: मुंबईत राज ठाकरे यांनी महायुतीसोबत असणं जास्त फायद्याचं होतं, असं राजकीय गणित मानलं जात होतं. राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीदेखील भेट घेतली होती. यानंतर राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. कदाचित राज ठाकरे यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच देवेंद्र फडणवीस त्यांचे आभार मानण्यासाठी शिवतीर्थ बंगल्यावर दाखल झाल्याची शक्यता आहे.
याशिवाय आगामी काळात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे. या निवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा मनसेची मदत लागणार आहे. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर भाजपकडून विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी महायुतीला दिलेल्या पाठिंब्याचं काय? असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे या भेटीत याबाबत चर्चा होते का? किंवा या विषयावर मार्ग निघतो का? ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.