कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य दिव्य स्मारकासह परिसर विकसित करणार -उपमुख्यमंत्री अजितदादा पवार…

Spread the love

संगमावरील मंदिराची जागेची प्रत्यक्ष पहाणी, सरदेसाई यांच्या वाड्याचीही पहाणी!

*दिपक भोसले/संगमेश्वर/दि २७ एप्रिल-* स्थानिक ग्रामस्थांच्या कोणत्याही भावना न दुखावता कसबा येथे भव्य दिव्य स्मारक उभे करण्यात येणार आहे. भव्य दिव्य स्मारक पाहण्यासाठी हजारो भक्त कसबा या गावात येणार असल्याने प्रसिद्ध आर्किटेक यांच्याकडून रचनात्मक आराखडा मागवून कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही या दृष्टीने भव्य दिव्य स्मारक उभे राहताना पाहिले जाईल. छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभे राहत असताना येथील पुरातन मंदिरे तसेच परिसर विकसित केला जाणार आहेत. येथील नद्या आणि परिसर विकसित केला जाणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.

छत्रपती संभाजी महाराज स्मारक व कसबा परिसर विकास संबंधित आढावा बैठक कसबा येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. कसबा कर्णेश्वर मंदिरात आयोजित आढावा बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत, महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे, आमदार शेखर निकम, आमदार भास्कर जाधव, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार प्रमोद जठार, बाबाजीराव जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र महाडिक, रोहन बने, विक्रांत जाधव, अप्पर जिल्हाधिकारी गलांडे, पुरातत्व विभागाचे स्थापत्य अभियंता इंद्रजित नागेशकर, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, संगमेश्वर तालुक्याच्या तहसिलदार अमृता साबळे उपस्थित होते.

पुरातत्व विभागाचे स्थापत्य अभियंता इंद्रजित नागेशकर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे कसबा येथील भव्य दिव्य स्मारक असेल याची चित्रफीत सादर केली त्यानंतर बोलताना उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी छ संभाजी स्मारक उभारताना स्थानिकांच्या भावना न दुखवता काम करणार असल्याचे सांगितले. संपूर्ण आराखडा पूर्ण झाल्यानंतर भव्य स्मारकासाठी निधी मंजूर केला जाईल. येत्या सोमवार पासून काम करण्यास सुरुवात करण्यात  येईल.  स्मारकाचे जांभा आणि दगडामध्ये काम केले जाईल.  स्मारकाला दोन प्रवेश असतील , रत्नागिरी जिल्ह्यात जे गड आहेत त्यांच्या प्रतिकृती याठिकाणी दाखविण्यात येणार आहे. कर्णेश्वर  मंदिराचे पावित्र्य जपण्यात यावे; या ठिकाणी चांगले करून दाखवायचे आहे.कोकणाच्या विकासाला फारसे महत्व दिले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 

कसबा ते श्रुंगारपूर असे पर्यटन स्थळ विकास करण्यात यावे तसेच नायरी घाट फोडून नायरी पाटण सातारा असा जवळचा मार्ग लवकर निर्माण करण्यात यावा त्यासाठी उपमुख्यमंत्री यांनी लक्ष देण्याची मागणी आमदार शेखर निकम यांनी केली.श्री राजेंद्र महाडिक यांनी पुरातन मंदिराची दुरुस्त करण्यात यावी असे सांगत यासंदर्भात सविस्तर निवेदन दिल्याचे सांगितले.

“दगडात केलेल्या कोरीव कामाची उत्कृष्ट कलाकृती म्हणजे संगमेश्वरचं कर्णेश्वर मंदिर. आज याठिकाणी जाऊन महादेवाचं मनोभावे दर्शन घेतलं. तसंच या मंदिराची माहिती घेतली, मंदिराच्या देखभालीच्या सूचना संबंधितांना केल्या.” – अर्थमंत्री अजित पवार

सुंदर आणि भव्य बनवता येईल, तेवढं बनवा.

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक व कसबा परिसर विकास संबंधित आढावा बैठक आज पार पडली. यावेळी महाराजांच्या स्मृती स्मारकासाठीचं प्रेझेंटेशन सादर करण्यात आलं. हे स्मृती स्मारक महाराजांना डोळ्यासमोर ठेऊन जेवढं सुंदर आणि भव्य बनवता येईल, तेवढं बनवा. काम हे दर्जेदार असलं पाहिजे, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना माननीय मंत्री महोदय यांनी दिल्या .

अजित पवार यांनी कृतज्ञतापूर्वक संभाजी महाराजांचे घेतले दर्शन…

संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला सर्वप्रथम कृतज्ञतापूर्वक अभिवादन केलं. त्यानंतर महाराजांचं स्मारक ज्याठिकाणी उभारण्यात येणार आहे, त्या सरदेसाई वाड्याची पाहणी केली. त्यासोबतच तिथल्या प्राचीन मंदिराची व शास्त्री नदीची देखील पाहणी केली. त्याचप्रमाणे कर्णेश्वर मंदिरात भगवंताचे मनोभावे दर्शन घेऊन मंदिराची सुद्धा माहिती घेतली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page