गुहागर – हाॅटेलमध्ये जेवणासाठी बसलेल्या वंचित बहुजन विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास ऊर्फ आण्णा जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्या हातावर वार केल्याने ते जखमी झाले असून, त्यांच्यावर गुहागर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी दुपारी घडली.
गुहागर तालुक्यातील नरवण फाटा येथील एका हाॅटेलमध्ये आण्णा जाधव जेवणासाठी बसले हाेते. त्यावेळी दुचाकीवरून तिघेजण तिथे आले आणि त्यांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यांच्यावर धारधार हत्याराने वार केल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यानंतर हल्लेखाेरांनी तिथून पळ काढला. हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या आण्णा जाधव यांना तातडीने गुहागर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी ग्रामीण रुग्णालयात आण्णा जाधव यांची भेट घेऊन हल्ल्याबाबत माहिती घेतली. हा हल्ला नेमका काेणी केला याचा शाेध गुहागर पाेलिस घेत आहेत.