गुहागर :- गुहागर समुद्रकिनारी रविवारी सकाळी मृतावस्थेत डाॅल्फिन मासा आढळला. हा मासा पाच फूट लांबीचा असून, गुहागर नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी किनाऱ्यावरच खाेल खड्डा खणून माशाला पुरले.
गुहागर नगरपंचायतीचे लाइफ गार्ड अक्षय लोखंडे रविवारी सकाळी आठ वाजता गुहागर समुद्रकिनारी कामासाठी हजर झाले हाेते. त्यांनी रात्री उशिरा समुद्रातून वाहून आलेला पाच फूट लांबीचा डॉल्फिन मासा समुद्रकिनारी मृतावस्थेत असल्याचे पाहिले. त्यांनी गुहागर नगर पंचायतीचे सुनील नवजेकर यांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर या मृत माशामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरू नये यासाठी त्याची तत्काळ विल्हेवाट लावण्याचे ठरविले. गुहागर नगरपंचायतीचे गणेश पावसकर, समर्थ भोसले, राजन परकर यांनी समुद्रकिनारी खोल खड्डा खणून त्यामध्ये डॉल्फिन माशाला पुरून त्याची विल्हेवाट लावली.