महाराष्ट्राची संस्कृती मराठी बाणाच्या माध्यमातून सातासमुद्रपार –पालकमंत्री उदय सामंत..

Spread the love

जाखडी, नमन, गण, गवळण, भूपाळी, शेतकरी गीत, वारकरी दिंडी, वासुदेव,

धनगरी, ठाकर, कोळी, आगरी नृत्य कलाविष्कारांनी रत्नागिरीकर मंत्रमुग्ध

रत्नागिरी, दि. ११ (जिमाका) – कोकणातील पारंपरिक जाखडी लोककला त्याचबरोबर १५० कलावंताचा गीत, संगीत, मराठी सण उत्सव परपंरांवर आधारित ‘मराठी बाणा’ कलाकृतीने आज रत्नागिरीकर मंत्रमुग्ध झाले. मराठी बाणा कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती साता समुद्रापार नेण्याची किमया केली आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्यावतीने येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात अशोक हांडे यांचे लेखन आणि संकल्पना असणारा ‘मराठी बाणा’ हा ७० एमएम मराठी कार्यक्रम आज झाला. तत्पूर्वी कोकण नमन कला मंचचे अध्यक्ष पी टी कांबळे यांनी जाखडी पारंपरिक कलेच्या माध्यमातून नमन, स्तवन, गण, गवळण सादर केली. मराठी बाणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मराठी सण, उत्सव, परंपरा हे भूपाळी, शेतकरी गीत, वासुदेव, वारकऱ्यांची दिंडी, धनगरी नृत्य, ठाकर नृत्य, कोळी नृत्य, आगरी नृत्य, भजन, गवळण, भारुड, दहिहंडी, गणेश उत्सव, लेझीमच्या माध्यमातून गीत, संगीत आणि नृत्याविष्कारातून सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

पालकमंत्री श्री. सामंत यावेळी शुभेच्छा देताना म्हणाले, महाराष्ट्राची संस्कृती सातासमुद्रापार नेण्याची किमया महाराष्ट्राच्या विशेषत: कोकणच्या सुपुत्राने अशोक हांडेनी केली आहे. जागतिक पातळीवरही त्यांचे नाव घेतले जाते. आपली मराठी आणि मराठीची संस्कृती ही कोकणात न राहता ती जगभरात गेली आहे. १५ तारखेपर्यंत चालणाऱ्या महासंस्कृती महोत्सवाचा रत्नागिरीकरांनी आस्वाद घेवून, अशीच भरभरुन दाद द्यावी.

सुरुवातीला श्री. हांडे यांनी श्री नटराजाच्या मूर्तीला तसेच जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर दीपप्रज्जल्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, बीपीन बंदरकर, पत्रकार हेमंत वणजू आदी रंगमंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाला रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून भरभरुन दाद दिली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page