महाराष्ट्र राज्यामध्ये 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून राज्यात तब्बल 1 लाख 427 मतदान केंद्रांची उभारणी केली गेली असून आदिवासी आणि दुर्गम भागामध्ये विशेष लक्ष दिले गेले आहे.
मुंबई- महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीकरिता राज्यभरात 1 लाख 427 मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. मतदारांना मतदान करणे सोयीचे ठरावे याकरिता राज्याच्या कानाकोपऱ्यात मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. राज्यात सर्वाधिक मतदार असलेल्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 8 हजार 462 मतदान केंद्र आहेत. त्यानंतर मुंबई उपनगरमध्ये 7 हजार 579, ठाणे – 6 हजार 955, नाशिक – 4 हजार 922 तर त्या खालोखाल नागपूर येथे 4 हजार 631 मतदान केंद्र आहेत.
शहरी भागातील मतदारांची अनास्था विचारात घेऊन निवडणूक आयोगातर्फे अनेक ठिकाणी गृहनिर्माण संकुलामध्ये मतदान केंद्र उभारली आहेत. त्याचप्रमाणात ग्रामीण भाग आणि आदिवासी भागामध्येही मतदानासाठी जवळचे केंद्र असावे याकरिताही मतदानाची संख्या वाढवली आहे.
राज्यात मुख्य मतदान केंद्र ही 1 लाख 186 असून त्यापैकी शहरी भागात 42 हजार 604 तर ग्रामीण भागात 57 हजार 582 इतकी मतदान केंद्र संख्या राहणार आहे. सहायक मतदान केंद्रांची संख्या 241 इतकी आहेत. मागील काही विधानसभेच्या निवडणुकांच्या तुलनेत यावेळी मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्यात आली आहे. यामुळे मतदारांची सोय होणार आहे. विशेषत: दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रात पोहोचता यावे यासाठी बऱ्याच ठिकाणी आवश्यक रॅम्पची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे.
आदिवासी, दुर्गम भागावर विशेष लक्ष
यंदाच्या निवडणुकीत आदिवासी मतदारसंघ आणि दुर्गम भागांतील मतदारांसाठी विशेष सुविधा देण्यावर भर दिला आहे. गडचिरोली, गोंदिया, नंदुरबार, धुळे, आणि अमरावती जिल्ह्यात जेथे आदिवासी आणि दुर्गम भाग आहेत तेथे मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे.निवडणूक आयोगाने मतदार सुविधांमध्ये सुधारणा केली आहे, जसे की मतदार सहाय्य केंद्रे, मतदार हेल्पलाईन , सूचना फलक यांचा समावेश आहे. तरुण मतदार, महिला मतदारांना लक्षात ठेवून हे उपाय योजण्यात आले आहेत.
शहरी गृहनिर्माण संस्थांमध्ये 1 हजारहून जास्त मतदान केंद्रे-
शहरी भागांमध्ये जसे की मुंबई, पुणे, ठाणे सारख्या शहरामध्ये अतिउंच इमारती आणि सहकारी गृहनिर्माण संस्थामध्ये 1 हजार 181 मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहे. तसेच झोपडपट्टी परिसरातही 210 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे.
नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता
निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेला अधिक सुलभ आणि पारदर्शक बनवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मतदार आपले मतदान केंद्र शोधण्यासाठी ऑनलाइन पोर्टल आणि मोबाइल अॅप्स वापरू शकतात. मतदार जागरूकता मोहिमेंतर्गत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मतदारांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातील.
राज्यातील एकूण मतदानकेंद्राची जिल्हानिहाय विभागणी
जिल्हा आणि मतदान केंद्रे-
पुणे – 8462
मुंबई उपनगर – 7579
ठाणे – 6955
नाशिक – 4922
नागपूर – 4631
अहमदनगर – 3765
सोलापूर – 3738
जळगाव – 3683
कोल्हापूर – 3452
औरंगाबाद – 3273
सातारा – 3165
नांदेड – 3088
रायगड – 2820
अमरावती – 2708
यवतमाळ – 2578
मुंबई शहर – 2538
सांगली – 2482
बीड – 2416
बुलढाणा – 2288
पालघर – 2278
लातूर – 2143
चंद्रपूर – 2077
अकोला – 1741
रत्नागिरी – 1747
जालना – 1755
धुळे – 1753
परभणी – 1623
उस्मानाबाद – 1523
नंदूरबार – 1434
वर्धा – 1342
गोंदिया – 1285
भंडारा – 1167
वाशिम – 1100
हिंगोली – 1023
गडचिरोली – 972
सिंधुदुर्ग – 921
राज्यातील एकूण मतदान केंद्रे – 1,00,427
राज्यात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे.