
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. एकामागून एक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत असून, शिवसेना शिंदे गट, भाजपामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. परंतु, अशातच कोकणात उद्धवसेनेला एक दिलासा मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेस नेते सहदेव बेटकर यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. मुंबईतील मातोश्री येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतः बेटकर यांच्या हाती शिवबंधन बांधले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काही लोक शिवसेनेतून गेले मोठे झाले. पण त्यांना मोठी करणारी माणसे माझ्यासोबत आहेत . शब्दाला जपणारी एकच शिवसेना आहे. कोकणातील निकाल अनपेक्षित होता. कोकणात कुणी कसा विजय मिळवला, याच्या सुरस कथा समोर येतात. थापा मारणारे हात वर करून मोकळे झाले आहेत. आता पुन्हा कोकणात पक्ष मजबूत करणार आहे. तळ कोकणापासून संपूर्ण कोकण दौरा करणार आहे. पूर्ण कोकण पुन्हा काबीज करणार आहे, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला.
कोकणात एक पाऊल टाका असे मला सांगण्यात आले पण मी सांगतो एकच पाऊल टाकणार नाही पुन्हा एकदा कोकण पादाक्रांत करेन. कोण मध्ये येतो बघू. कोकणात या हे जसे तुम्ही सांगत आहात तसा अख्खा महाराष्ट्र, माझे शिवसैनिक, शेतकरी बांधव सगेळ सांगत आहेत की, आम्ही फसवलो गेलो. आत्ता लोकांना खरी आपल्या शिवसेनेची गरज आहे. येत्या १६ एप्रिलला नाशिकला शिबीर घेण्यासाठी जातो आहे. सुट्ट्या संपल्या की माझा सलग दौरा मी तळ कोकणापर्यंत करणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, स्थानिक पातळीवर काही कुरबुरी झाल्या, त्या झाल्या असतील तरीही ठीक आहे. पण आपले घर सोडायचे नसते हे लक्षात ठेवा. त्यांच्यात आणि तुमच्यात फरक आहे, कारण तुम्ही निष्ठेने राहिला. जे जात आहेत त्यांच्या लेखी आपल्याकडे काही नसेल. माझ्याकडे तुम्ही सगळे आहेत ही गोष्ट माझ्यासाठी मोठी आहे. कोकणातला एकही कोपरा असा सोडायचा नाही जिथे भगवा फडकणार नाही हे लक्षात ठेवा, असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.