“काँग्रेसची आणि बाळासाहेबांची विचारधारा वेगळी, पण…” प्रियंका गांधी यांचं मोदींच्या आव्हानाला प्रत्युत्तर…

Spread the love

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. शिर्डीमध्ये आयोजित सभेत प्रियंका गांधी यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला.

शिर्डी : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सभा सुरू आहेत. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव प्रियंका गांधी आज (16 नोव्हेंबर) राज्यातील अहिल्यानगर आणि कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी शिर्डीत जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना प्रियंका गांधी यांनी महायुती तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

सत्ताधाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला : जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिर्डीवाले साईबाबा की जय अशा घोषात प्रियंका गांधींनी भाषणाला सुरवात केली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला, त्यातही मोठा भ्रष्टाचार करण्यात आला,” असा आरोप प्रियंका गांधी यांनी सरकारवर केलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आव्हानाला प्रत्युत्तर :

मुंबईतील एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, “उद्धव ठाकरे तुमच्यात हिंमत असेल, तर राहुल गांधींकडून सावरकर आणि बाळासाहेबांबद्दल दोन चांगले शब्द बोलायला लावा.” त्यांच्या या आव्हानाला प्रियंका गांधींनी प्रत्युत्तर दिलं. “बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसची विचारधारा वेगळी होती, पण आजपर्यंत आम्ही कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला नाही,” असं प्रियंका गांधी म्हणाल्या.

आमच्या हातात सत्ता द्या :

“संविधानाच्या गप्पा मारणारे संविधानाचा अनादर करुन राज्यातील जनतेनं निवडलेलं सरकार ईडीसारख्या चौकश्या मागे लाऊन पाडलं, हीच का यांची संविधानावरील निष्ठा? असा सवाल त्यांनी केला. “मी आव्हान देते की, जातनिहाय जनगणना करुन दाखवा. आमच्या हातात सत्ता द्या आम्ही 50 टक्यांच्या पुढे आरक्षण देऊ,” असं आश्वासन प्रियंका गांधी यांनी दिलं.

जनतेची फसवणूक केली –

“पंतप्रधान हे मात्रुस्थानी असतात. आई कधीच भेदभाव करीत नाही. मग मोदी दुजाभाव करुन राज्यातील उद्योग गुजरातला नेत आहेत. शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांद्याबाबत सरकारच्या धोरणानं शेतकऱ्यांची वाट लावली. आपण तीन लाखांपर्यंत कर्जमाफी करू. निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं ‘लाडकी बहीण योजना’ आणली. पण महागाई वाढवून जनतेची फसवणूक केली,” अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली. बेरोजगारीच्या प्रश्नावरही त्यांनी लक्ष वेधून राज्यात लाखोंच्या संख्येनं रोजगार तसंच बेरोजगार भत्ता देण्याची ग्वाही दिली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page