रत्नागिरी : स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या मोहिमेचा शुभारंभ 18 सप्टेंबर रोजी होणार आहे. 2 ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत सर्व विभागांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात याबाबत आज बैठक घेण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे, कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आुयक्त इनुजा शेख आदी उपस्थित होते. क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर विविधि विभागांची बैठक आयोजित करावी. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी सर्वांना सूचना द्या. वेगवेगळे नाविण्यपूर्ण उपक्रम करावेत, त्याचबरोबर त्याचे छायाचित्र पोर्टलवर अपलोड करावेत. समुद्र किनारी स्वच्छता बाबतही सर्वांनी नियोजन करावे.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार म्हणाले, सफाई मित्रांना लाभ द्यायचा आहे, त्याचबरोबर टाकाऊ पासून टिकाऊ यासाठी तसेच विविध स्पर्धांसाठी पारितोषिके देण्यात येणार आहेत. सहकारी गृह संस्था, विद्यार्थी, शिक्षक, नागरिक या सर्वांना सहभागी करुन उपक्रम करावेत. सफाई कामगारांच्या कल्याणांसाठीच्या योजनाही राबवाव्यात.
विविध योजनांची प्रलंबित प्रकरणे मार्गी लावा – जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री वयोश्री, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन, युवा कार्य प्रशिक्षण, प्रधानमंत्री जनमन, विश्वकर्मा अशा योजनांचा यावेळी सविस्तर आढावा घेतला. वयोश्री योजनेमध्ये 10 हजार अर्जांना मंजुरी देवून जिल्हाधिकारी म्हणाले, माझी लाडकी बहीण योजनेत आधार सिडींगची प्रलंबित प्रकरणांवर कार्यवाही पूर्ण करावी. वयोश्री योजनेतील मंजूर अर्ज अपलोड करावेत. उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर बैठक घेऊन तीर्थ दर्शन योजनेबाबत यादी तयार करुन पाठवावी. युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये एमआयडीसी, जिल्हा उद्योग केंद्र यांनी अधिकाधिक उद्दिष्ट गाठून पूर्ण करावेत. पीएम जनमन योजनेत जनधन योजनेसाठी अग्रीण जिल्हा व्यवस्थापक यांना पत्र द्यावेत. किसान सन्मान योजना, मातृवंदना, शिधा पत्रिका वाटप अशा विविध योजनांचे लाभ वाढवावेत. तसेच विश्वकर्मा योजनेसाठी सरंपच स्तरावर प्रलंबित असणारी प्रकरणे गटविकास अधिकाऱ्यांनी मंजुरीसाठी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर फिशिंग नेट मेकर, क्वॉयर विव्हर, ब्रुम मेकर, बास्केट मेकर या क्षेत्रातील लाभार्थी यादी पाठवावी.