
पुणे- राज्याच्या तापमानात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. कधी थंडी पडत आहे तर कधी उष्णता. सध्या राज्यात सकाळी आणि रात्री गारठा जाणवत आहे. तर दिवसा प्रचंड उकाडा जाणवत आहे. फेब्रुवारी हा थंडीचा महिना असला तरी पुढील काही दिवस राज्याच्या तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उन्हाचा कडाका वाढणार असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडतांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात उन्हाची तीव्रता ही वाढू लागली आहे. राज्यात पुढील २ ते ४ दिवसांत किमान व कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होणार आहे. राज्यात फेब्रुवारीपासून तापमान वाढीला सुरुवात होणार आहे. सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती पूर्व राजस्थान व आजूबाजूच्या परिसरात असून येत्या काही दिवसात राजस्थानसह उत्तर प्रदेशच्या काही भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर राज्यात येत्या ५ दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमानात वाढ होणार असून उष्णता वाढणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. पुढील काही दिवसांत तापमान वाढणार असून त्यानंतर तापमानात थोडी घट होणार आहे. विदर्भात मात्र, तापमानात फारसा बदल होणार नाही. मात्र, पुढील काही दिवसांत तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता आहे. राज्यात बहुतांश जिल्ह्यात हवामान कोरडे व शुष्क राहण्याची शक्यता आहे.
राज्यात कमाल व किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. सकाळी १० नंतर रखरखीत ऊन पडत असल्याने जिवाची लाही लाही होत आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात कमाल व किमान तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील तीन ते चार दिवस हे तापमान कायम राहणार आहे. राज्यात हवामानात कोरडे राहणार असून पहाटे गारवा व दुपारी ऊन अशी अवस्था कायम राहणार आहे. मराठवाड्यात व विदर्भात देखील हीच स्थिती राहणार आहे. येथे देखील किमान व कमाल तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाच्या झळा तीव्र होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर मध्य महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या पहिल्या काही दिवसांत थंडी जाणवणार आहे.