केंद्राला मराठवाड्याचा विसर? 17 सप्टेंबर ‘हैदराबाद मुक्ती दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय…

Spread the love

हैदराबाद मुक्त करणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण करण्यासाठी आणि तरुणांच्या मनात देशभक्तीची ज्योत जागृत करण्यासाठी केंद्र सरकारनं दरवर्षी 17 सप्टेंबर हा हैदराबाद मुक्ती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, हाच दिवस महाराष्ट्रात ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन’ म्हणून साजरा होतो. याचा उल्लेख मात्र सरकारनं केलेला नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं मंगळवारी हैदराबादसाठी मोठी घोषणा केलीय. इथून पुढं दरवर्षी 17 सप्टेंबर हा ‘हैदराबाद मुक्ती दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं एक अधिसूचना जारी केलीय. त्यात म्हटलंय की, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. मात्र त्यानंतरही हैदराबादला 13 महिने स्वातंत्र्य मिळालं नाही. हैदराबाद हे निजामाच्या अधिपत्याखाली होतं. ‘ऑपरेशन पोलो’ नावाच्या पोलिस कारवाईनंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी हा परिसर निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला.

अधिसुचनेत काय…

या अधिसूचनेमध्ये म्हटलंय की, “हैदराबाद मुक्त करणाऱ्या हुतात्म्यांची आठवण ठेवण्यासाठी आणि तरुणांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी, भारत सरकारनं दरवर्षी 17 सप्टेंबर हा ‘हैदराबाद मुक्ती दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.” 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. तेव्हा रझाकारांनी भारतीय संघराज्यात विलीन होण्यास विरोध केला. त्यांनी हैदराबादला पाकिस्तानात सामील होण्यासाठी किंवा मुस्लिम अधिराज्य होण्यासाठी आवाहन केलं होतं. हा प्रदेश भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी स्थानिक लोकांनी रझाकारांच्या अत्याचाराविरुद्ध धैर्यानं लढा दिला. रझाकार या खासगी सैन्यदलानं येथील लोकांवर अत्याचार केले होते. त्यांनी हैदराबादमधील तत्कालीन निजाम राजवटीचं रक्षण केलं होतं.

अनेक कार्यक्रमांचं आयोजन…

17 सप्टेंबर 1948 रोजी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सुरु केलेल्या सैन्यदलाच्या कारवाईनंतर निजामाच्या अधिपत्याखाली असलेलं हैदराबाद राज्य भारतात जोडलं गेलं. गेल्या काही वर्षांत नरेंद्र मोदी सरकारकडून दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी ‘हैदराबाद मुक्ती दिन’ साजरा करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. मागील वर्षी या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही सहभाग घेतला होता.

मराठवाड्याचा विसर ?…

दरवर्षी 17 सप्टेंबर हा दिवस ‘मराठवाडा मुक्ती दिन’ म्हणून संपुर्ण मराठवाड्यात उत्साहात साजरा केला जातो. मात्र केंद्र सरकारनं अधिकृतरित्या हा दिवस ‘हैदराबाद मुक्ती दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतल्यानं केंद्र सरकारला मराठवाड्याचा विसर पडलाय का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page