
संगमेश्वर- तालुक्यातील जि. प. शाळा डिंगणी गुरववाडी येथे आज सोमवार, दि. ०७ एप्रिल रोजी केंद्रीय शिक्षण परिषद संपन्न झाली. यावेळी कोळंबे विभागाचे विस्तार अधिकारी श्री. शशिकांत त्रिभुवने यांनी उपस्थित राहून शिक्षकांचे उद्बोधन केले.
केंद्र प्रमुख श्री. मदन वाजे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मागील शिक्षण परिषदेचा आढावा घेत मार्गदर्शन केले. यानंतर पदवीधर शिक्षक श्री. अजिंक्य नाफडे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अध्ययनात वापर या विषयाची मांडणी करताना चॅटजीपीटीचा प्रभावी वापर करण्याबाबत पीपीटीच्या सहाय्याने माहिती दिली.
निपुण भारत अध्ययन स्तर इ. २ री ते ५ वी संदर्भात उपशिक्षक श्री. युवराज पाटील यांनी भाषा विषयासंदर्भात तर श्री. संजय तटकरे यांनी भाषा विषयासंदर्भात विवेचन केले.
दरम्यान संपन्न झालेल्या छोटेखानी सत्कार समारंभात मेजर सुभेदार चाळके प्रतिष्ठानचे सचिव श्री. सुधीर चाळके यांनी ट्रस्टच्या माध्यमातून डिंगणी केंद्रातील विद्यार्थ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी विविध कार्यक्रम राबवून मंच उपलब्ध करून दिला. याबाबत मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल-श्रीफळ-पुष्पगुच्छ, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व गौरव पत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला.
यानंतर कोळंबे बीटचे विस्तार अधिकारी श्री. शशिकांत त्रिभुवने यांचा सत्कार करण्यात आला. डिंगणी गुरववाडी केंद्राचे माजी केंद्र प्रमुख श्री. संतोष मोहिते यांनी आपल्या कार्यकाळात शिक्षणसेवक म्हणून रुजू झालेल्या नवनियुक्त शिक्षकांना उत्तम मार्गदर्शन केले त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सत्कार करण्यात आला. केंद्र प्रमुख म्हणून नव्याने जबाबदारी स्वीकारणारे श्री. मदन वाजे सर आणि आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विद्यार्थीप्रिय शिक्षक तसेच राज्य शासनाच्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर इ. ६ वी ते १२ वी पर्यंतच्या कार्यानुभव विषयाच्या समितीवर नुकतीच निवड झाल्याबद्दल श्री. संतोष चव्हाण यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी डिंगणी गुरववाडी शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. विशाल कदम, केंद्रातील शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते. यानंतर श्री. संजय तटकरे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
