
लांजा – तालुक्यातील शेवरवाडी येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून १५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ते ८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवरवाडी येथे रमाकांत मानकर यांच्या बंगल्यात भाड्याने राहणाऱ्या सोनल नितीन पवार (वय २९) यांच्या घरी अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. चोरट्याने घराच्या दर्शनी दरवाजाचे कडी कोयंड्यातील कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि बेडरूममधील कपाटात ठेवलेला ५ हजार रुपये किमतीचा निकॉन कंपनीचा कॅमेरा (मॉडल ५६००) चोरून नेला.
याचवेळी चोरट्याने याच बंगल्याचे मालक रमाकांत मानकर यांच्या घराच्या दर्शनी दरवाजाच्या लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडले आणि आतील दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर मानकर यांच्या मालकीची, अंगणात उभी केलेली १० हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची सुपर स्प्लेंडर एक्सटेक मोटारसायकल (क्रमांक MH 08 BD 2668) देखील चोरून नेली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. याप्रकरणी सोनल पवार यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ आणि ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.