
वन विभागाच्या नियोजनबद्ध बचाव मोहिमेला यश; वैद्यकीय तपासणीनंतर बिबट्याची नैसर्गिक अधिवासात सुखरूप मुक्तता…
*रत्नागिरी | जनशक्तीचा दबाव न्यूज-* रत्नागिरी तालुक्यातील रानपाट गोणबरेवाडी येथे कोंबड्यांच्या खुराड्यात शिरलेल्या बिबट्याला वन विभागाच्या पथकाने सुरक्षितपणे जेरबंद केले. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वन विभागाने तातडीने घटनास्थळी दाखल होत नियोजनबद्ध पद्धतीने बचाव मोहीम राबविल्याने संभाव्य धोका टळला. वैद्यकीय तपासणीत बिबट्या निरोगी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले.
*खुराड्यात बिबट्या अडकल्याची माहिती; वन विभागाची धाव..*
रानपाट गोणबरेवाडी येथील रहिवासी अनंत रामा गोनबरे यांच्या घरासमोरील कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्या शिरल्याचे निदर्शनास आले. याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस पाटलांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधला. माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान बिबट्या खुराड्यात शांतपणे बसलेला असल्याचे आढळून आले.
*लोखंडी पिंजऱ्याच्या मदतीने मोहीम यशस्वी..*
बिबट्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडण्यासाठी वन कर्मचाऱ्यांनी विशेष खबरदारी घेतली. खुराड्याच्या दरवाजाला लोखंडी ग्रील आणि प्लायवूडच्या साहाय्याने अंशतः बंदिस्त करण्यात आले. त्यानंतर प्रवेशद्वारासमोर लोखंडी पिंजरा लावण्यात आला. योग्य नियोजन आणि सावधगिरीमुळे बिबट्या थेट पिंजऱ्यात जेरबंद झाला.
या कारवाईनंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. वन विभागाच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली.
*पशुवैद्यकीय तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात मुक्तता..*
जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्याची जाकादेवी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीत बिबट्या निरोगी आणि सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले.
*वन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम..*
ही कारवाई विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मोहिमेदरम्यान परिक्षेत्र वन अधिकारी विक्रम गुरव, जाकादेवीच्या वनरक्षक शर्वरी कदम, कांदळवन कक्षाचे किरण पाचारणे व धनंजय यादव, तसेच महेश धोत्रे आणि दीपक कदम उपस्थित होते.
*वन्यप्राण्यांचा वावर; ग्रामस्थांना सतर्कतेचे आवाहन..*
कोकणातील ग्रामीण भागात वन्यप्राण्यांचा वावर आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित अंतर राखावे. बिबट्याला घेरण्याचा, त्याच्या जवळ जाण्याचा किंवा स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नये. अशा घटना घडल्यास तातडीने वन विभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात येते.
**जनशक्तीचा दबाव न्यूज**
*दबाव जनशक्तीचा, निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा*

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*