‘पुस्तकांमुळे आपण माणसांशी जोडले जातो’- डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी ….

Spread the love

रत्नागिरी /प्रतिनिधी- दि. १० जानेवारी २०२५ रोजी  गोगटे जोगळेकर  महाविद्यालयात (स्वायत्त) ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत  वाङ्मयमंडळातर्फे ‘वाचन- संवाद कौशल्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सभागृहात सदर कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यशाळेत लेखक, समीक्षक आणि अभिवाचक म्हणून सुपरिचित असलेल्या डॉ. वंदना बोकील- कुलकर्णी यांनी साधन व्यक्ती म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्रास्ताविकात मराठी वाङ्मय मंडळाचे समन्वयक आणि मराठी विभाग प्रमुख डॉ. शिवराज गोपाळे यांनी मराठीवाङ्मय मंडळांतर्गत होणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. याच कार्यशाळेचे औचित्य साधून ‘लेखक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत डॉ. निधी पटवर्धन यांनी डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांची मुलाखत घेतली. ‘वाचनाची लागलेली गोडी ते लेखिका’ हा प्रवास या मुलाखतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसमोर उलगडला गेला.
सदर कार्यशाळेत डॉ. वंदना बोकील यांनी कोणती पुस्तके वाचावीत, वेगवेगळे साहित्यप्रकार कसे अभ्यासावे, वाचनासाठी पुस्तके कशी निवडावी या संदर्भात सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अभिवाचन कसे करावे हे प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. डॉ.अरुणा ढेरे लिखित ‘सीतेची गोष्ट’ या कथेचे यावेळी त्यांनी अभिवाचन केले. पुस्तकांमुळे आपण माणसांशी जोडले जातो. वेगवेगळ्या संस्कृतींचा आपल्याला परिचय होतो, असे आवर्जून विद्यार्थ्यांशीसंवाद साधताना सांगितले. वाचनामुळे संवाद कौशल्य कसे विकसित होते याचेही मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्याअध्यक्षीय समारोपाच्या मनोगतात कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी वाचनाने आपण समृद्ध होतो. त्यामुळे वाचन संस्कृती आपण जपली पाहिजे, अधिकाधिक वाचन केले पाहिजे असे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्ष कला शाखेचा विद्यार्थी श्रेयस पाटील याने केले तसेच प्रमुख अभ्यागत डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांचा परिचय श्री. दीप भायजे याने करून दिला.
कार्यशाळेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ. सीमा वीर यांनी केले. या कार्यशाळेप्रसंगी महाविद्यालय ग्रंथालय समिती समन्वयक डॉ. कल्पना आठल्ये, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे, सहायक ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे, भाषा विभागातील प्राध्यापक तसेच सर्व शाखांतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page