नारायण राणेंमध्ये केंद्रात मंत्री बनण्याची कॅपेसिटी आहे त्यामुळे राणेंनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा आहे असे विधान शिंदेसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचा दावा असलेली रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा भाजपला सोडली जाणार का याविषयी जोरदार चर्चा आहे.
राणेंमध्ये पुन्हा केंद्रात मंत्री बनण्याची कॅपेसिटी..मंत्री दीपक केसरकर यांचे राणेंच्याउमेदवारीला समर्थन…शिवसेनेची पारंपारिक जागा भाजपला मिळणार?..
सिंधुदुर्ग : नारायण राणेंमध्ये पुन्हा केंद्रात मंत्री बनण्याची कॅपेसिटी आहे. त्यामुळे त्यांनीच लोकसभा लढवावी, अशी आमची सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांना वगळून मंत्रीपद घालवायचे का? असा उलट प्रश्न आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला. दरम्यान या ठिकाणी किरण सामंत यांचे नाव चर्चेत आहेत. त्यांचा ही लोकसंपर्क दांडगा आहे. परंतू नेमकी कोणाला संधी द्यावी याचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेणार आहेत. उमेदवार जाहीर करण्यास कितीही उशिर झाला तरी आमचा विजय निश्चित आहे, असे त्यांनी सांगितले.
भाजपा-शिवसेना युतीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नाही. याबाबत विचारले असता, राणे हे केवळ एक व्यक्ती नाही तर पुन्हा त्यांची केंद्रात मंत्री बनण्याची कॅपेसिटी आहे. दुसरीकडे राज्यसभेवर त्यांना घेण्यात आलेले नाही. त्यामुळे कोकणचे मंत्रीपद टिकविण्यासाठी त्यांनाच तिकीट देणे गरजेचे आहे. तरच ते मंत्रीपद राहणार आहे. त्यामुळे आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी सर्व ताकद पणाला लावणार आहोत. त्यामुळे आयत्यावेळी जरी नाव जाहीर झाले तरी कोणताही परिणाम होणार नाही.