रत्नागिरी : रत्नागिरी, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली अशा 15 जिल्ह्यांमध्ये विविध संपूर्ण सरकारी आस्थापना, नगर परिषद, महानगरपालिका सुरक्षेचा भार सांभाळणाऱ्या सुरक्षा रक्षक मंडळाने खाकीची लढाई अखेर जिंकली आहे. मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना आता खाकी गणवेश वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे सुरक्षा रक्षक निळ्या रंगाचा गणवेश वापरत होते. भाजपा नेते निलेश राणे यांच्या सहकार्याने संघटनेची ही मागणी मान्य झाली आहे.
भारतीय सुरक्षा रक्षक आणि श्रम कामगार युनियनने ही मागणी केली होती. यासाठी युनियनचे अध्यक्ष हरेंद्र विजय चव्हाण आणि सदस्यांनी माजी खासदार निलेश राणे यांची भेट घेतली होती. यासंदर्भात निलेश राणे यांनी तातडीने महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार सुद्धा केला होता. या पार्श्वभूमीवर कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी युनियनचे प्रतिनिधी, अश्विनी सोनवणे, प्रथमेश भाई आदी सोबत झालेल्या बैठकीत ही मंजुरी दिली आहे.
गेले नऊ वर्षे हे सुरक्षारक्षक गणवेशाचा रंग बदलण्यासाठी लढा देत होते. राज्यातील महापालिका नगरपरिषद यांच्यासह इतर विविध आस्थापना सरकारी रुग्णालय, शाळा, विद्यालय, महाविद्यालय आदींना सुरक्षा रक्षक मंडळाकडून सुरक्षा पुरविली जाते. राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये या मंडळाचे सुरक्षा रक्षक कर्तव्य बजावत आहे. तसेच कोल्हापूर येथील महालक्ष्मीच्या मंदिराच्या सुरक्षेचा काही भागही याच सुरक्षा रक्षकांच्या खांद्यावर आहे. मात्र गणवेश निळ्या रंगाचा असल्याने लोकांवर त्यांची म्हणावी तशी छाप पडत नव्हती. मंडळाच्या मागून आलेल्या अनेक सुरक्षारक्षक एजन्सीच्या गणवेशाचा रंग प्यारा मिलिटरी करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या गणेशाचा मूळ रंग बदलून तो खाकी करावा अशी मागणी राज्यभरातील सुरक्षा रक्षकांकडून नऊ वर्षापासून केली जात होती. ही मागणी अखेर मान्य करण्यात आली आहे. यासाठी संघटनेच्या अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी माजी केंद्रीय मंत्री रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायणराव राणे यांचे आभार मानलेच परंतु मागणीच्या पूर्ततेसाठी सक्रिय पाठिंबा देणाऱ्या आणि वेळोवेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार करणाऱ्या भाजपा नेते निलेश राणे यांचे आभार मानले.