प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून संघटनात्मक नियुक्ती
२७ एप्रिल/रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजय व्हावा याकरिता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहा जणांची संघटनात्मक नियुक्ती जाहीर केली आहे. यामध्ये आमदार, माजी मंत्री, खासदार, जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे.
या पदाधिकाऱ्यांची विधानसभानिहाय निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांनी २५ एप्रिल ते ५ मे या कालावधीत ते मतदारसंघात पूर्णवेळ मुक्कामी जाऊन प्रत्येक बूथ विजयी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. लोकसभेचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय व्हावा, याकरिता हे सर्वजण मार्गदर्शन करणार आहेत. निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
चिपळूण विधानसभेसाठी नागपूर दक्षिणचे आमदार मोहन मते, रत्नागिरीसाठी राळेगाव विधानसभेचे आमदार, माजी मंत्री अशोक उईके, राजापूरसाठी विधान परिषदेचे आमदार रामदास आंबटकर यांची निवड जाहीर केली आहे. तसेच कणकवली विधानसभेसाठी गडचिरोली-चिमुरचे खासदार अशोक नेते, कुडाळसाठी वर्ध्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, सावंतवाडीकरिता अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष उत्तम इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.