
मुंबई- भाजपचा उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील उमेदवार अखेर ठरला आहे. केंद्र व राज्यातील या सत्ताधारी भगव्या पक्षाने या मतदारसंघातील विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे. आता लोकसभा निवडणुकीत त्यांचा सामना महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांच्याशी होईल. निकम यांच्या उमेदवारीने या मतदारसंघात अतितटीची लढाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजपने गत अनेक दिवसांपासून उत्तर मध्य मुंबई लोकसभा निवडणुकीची उमेदवारी राखून ठेवली होती. त्यांनी विद्यमान खासदार पूनम महाजन यांना तिकीट दिले नव्हते. त्यामुळे त्यांचा पत्ता कट होणार हे जवळपास स्पष्ट झाले होते. त्यानंतर भाजप या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी देणार अशी चर्चाही सुरू झाली होती. पण आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. भाजपने शनिवारी जारी केलेल्या आपल्या 15 व्या यादीत या मतदार संघाची उमेदवारी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना देण्याची घोषणा केली.
कोण आहेत उज्ज्व निकम?…
उज्ज्वल निकम हे देशातील सर्वात प्रसिद्ध सरकारी वकिलांपैकी एक आहेत. त्यांनी मुंबईवर 26/11 चा अतिरेकी हल्ला करणाऱ्या अजमल कसाबसह, 1993 चे साखळी बॉम्बस्फोट, गुलशन कुमार हत्याकांडा व प्रमोद महाजन हत्याकांडासारखे अनेक हायप्रोफाईल खटल्यांत सरकारतर्फे यशस्वी युक्तिवाद केला आहे. त्यांनी भाजपने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
पूनम महाजन दिवंगत प्रमोद महाजन यांच्या कन्या…
पूनम महाजन या भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत. प्रमोद महाजन यांची 2006 मध्ये हत्या केल्यानंतर त्या भाजपत सक्रीय झाल्या होत्या. 2009 मध्ये त्यांनी घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक लढवली होती. पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2014 च्या मोदी लाटेत त्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर पोहोचल्या होत्या. त्यांनी काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांचा पराभव केला होता.
पूनम महाजन एक प्रशिक्षित पायलटही आहेत. त्यांनी अमेरिकेच्या टेक्सास येथून वैमानिकाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांना सुमारे 300 तासांच्या उड्डाणाचा अनुभव आहे. 2012 मध्ये त्यांनी ब्राइटन स्कूल ऑफ बिझनेस अँड मॅनेजमेंटमधून बी. टेकची पदवी घेतली. पण आता भाजपने त्यांना लोकसभेची उमेदवारी नाकारून जबर झटका दिला आहे.