मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील सहावे सर्वात श्रीमंत उद्योगपती बिल गेट्स पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वयाच्या ६७ व्या वर्षी गेट्स हे पुन्हा एकदा प्रेमात पडले असल्याचे समोर आले आहे. मायक्रोसॉफ्टमधील एका महिला कर्मचाऱ्यासोबतचे अफेअर आणि ३० वर्षांचे लग्न मोडल्यानंतर बिल गेट्स यांचे नवे प्रेम प्रकरण पुढे आले आहे. पीपल डॉट कॉम (People.com) मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, गेट्स हे सध्या पॉला हर्ड या ६० वर्षीय महिलेला डेट करत आहेत.
२०२१ मध्ये, गेट्स यांनी त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांना घटस्फोट दिला होता. त्यानंतर गेट्स ६० वर्षांच्या पॉला हर्ड या महिलेला डेट करत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून दोघांच्या अनेक गाठीभेटी झाल्या आहेत. पॉला या ओरॅकल कंपनीचे दिवंगत सीईओ मार्क हर्ड यांच्या पत्नी आहेत. मार्क हर्ड यांचे २०१९ साली कर्करोगाने निधन झाले. पॉला हर्ड नॅशनल कॅश रजिस्टर कंपनीत कार्यरत आहेत. त्यांना कॅथरीन आणि कॅली या दोन मुली आहेत. पॉला यांच्या पतीने सुमारे ५०० दशलक्ष डॉलर्सची मालमत्ता मागे सोडली आहे. पॉला यांनी टेक्सास विद्यापीठातून बिजनेस ॲडमिनिस्ट्रेशनची पदवी घेतली आहे. त्यांनी एका टेक कंपनीत इव्हेंट प्लॅनर म्हणूनही काम केले आहे.
रिपोर्टनुसार, बिल गेट्स आणि पॉला यांची भेट एका टेनिस सामन्यादरम्यान झाली होती. दोघेही टेनिसचे चाहते आहेत. २०१५ मध्ये एका टेनिस सामन्यादरम्यान ते एकमेकांना भेटले होते. याशिवाय दोघांचे अनेक कॉमन फ्रेंड्स आहेत. यानिमित्ताने ते वारंवार भेटत राहिले. गेल्या महिन्यात या दोघांचा एक फोटोही समोर आला, ज्यामध्ये ते ऑस्ट्रेलियन ओपनदरम्यान मॅच एन्जॉय करताना दिसले होते. न्यूज डॉट कॉमच्या वृत्तानुसार, दोघांच्या कॉमन फ्रेंडचे म्हणणे आहे की, दोघेही रोमँटिक रिलेशनशिपमध्ये आहेत आणि ते वेगळे होऊ शकत नाहीत.
२०२१ मध्ये बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांनी ३० वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आणत घटस्फोट घेतला. दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. गेट्स यांना तीन अपत्य आहेत. घटस्फोटानंतरही, दोघांनी गेट्स फाउंडेशन एकत्र चालवण्याचा निर्णय घेतला. गेट्स हे जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती $१०५ अब्ज आहे. १९७५ मध्ये बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टचा पाया घातला.