मुंबई l 10 मार्च- उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे आमदार रवींद्र वायकर यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी रवींद्र वायकर यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा जंगी कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे शिवसेना शिंदे गटात स्वागत केले.
शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केल्यानंतर रवींद्र वायकर म्हणाले की, गेली ५० वर्ष मी शिवसेनेत जे पडेल ते काम केले आहे. चार वेळा नगरसेवक, तीन वेळ आमदार हे पर्यायाने आले. ज्यावेळी मी आता पक्षप्रवेश करतोय, त्या मागचं कारण वेगळं आहे. कोविडमध्ये कामे झाली नाहीत. पण आता आरेतील रस्त्यासाठी पैसे पाहिजेत. लोक रस्त्यासाठी आणि पाण्यासाठी रडतायत. यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात. धोरणात्मक निर्णय सत्तेत असल्याशिवाय सोडवता येत नाहीत. लोक आपल्याला निवडून देतात. आपण काम केलं पाहिजे, असे रविंद्र वायकर म्हणाले.
रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला होता. कथित जोगेश्वरी भूखंड खरेदी घोटाळा प्रकरणी ते अडचणीत आले होते. रवींद्र वायकर यांनी ईडी चौकशीवरुन शिंदे गट आणि भाजपवर प्रचंड टीकाही केली होती. पण आज अखेर वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. वायकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्यासोबत आज शिंदे गटाच प्रवेश केला.
रवींद्र वायकर यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार गजानन कीर्तिकर मंचावर होते. रवींद्र वायकर आगे बडो हम तुमारे साथ हैं अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली. उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतील नेते आणि विश्वासू सहकारी म्हणून वायकर यांची ओळख आहे. त्यांची काम करण्याची वृत्ती आणि अभ्यासूपणा यामुळेच ते उद्धव ठाकरे यांच्या खास जवळचे होते.