हैदराबाद- सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्स विरुद्ध शेवटच्या बॉलवर 1 रनने थरारक विजय मिळवला आहे. राजस्थानला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 2 धावांची गरज होती. तेव्हा हैदराबादचा बॉलर भुवनेश्वर कुमारने अचूक बॉल टाकत रोवमॅन पॉवेल याला एलबीडब्ल्यू आऊट केलं. हैदराबादने अशाप्रकारे 1 रनने सनसनाटी विजय मिळवला. हैदराबादने या विजयासह राजस्थानचा विजयरथ रोखला. राजस्थानचा हा आयपीएलच्या 17 व्या मोसमातील चेस करताना पहिला पराभव ठरला. हैदराबादने राजस्थानला विजयासाठी 202 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 200 धावाच करता आल्या.
दरम्यान त्याआधी हैदराबादने टॉस जिंकला. कॅप्टन पॅट कमिन्स याने बॅटिंगचा निर्णय घेतला. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 201 धावा केल्या. हैदराबादकडून ट्रेव्हिस हेड याने 44 बॉलमध्ये 58 धावांची खेळी केली. अभिषेक शर्मा याने 12 आणि अनमोलप्रीत सिंह याने 5 धावा केल्या. तर त्यानंतर नितीश रेड्डी आणि हेन्रिक क्लासेन या जोडीने हैदराबादला 200 पार पोहचवलं. नितीशने हैदराबादसाठी सर्वाधिक धावा केल्या. नितीशने 42 बॉलमध्ये 8 सिक्स आणि 3 चौकारांच्या मदतीने नॉट आऊट 76 रन्स केल्या. तर हेन्रिक क्लासेनने 19 चेंडूत नाबाद 42 धावा जोडल्या. राजस्थानकडून आवेश खान याने 2 विकेट्स घेतल्या. तर संदीप शर्मा याने 1 विकेट घेतली.