जनशक्तीचा दबाव न्यूज | नंदुरबार | फेब्रुवारी ०४, २०२३.
बहिणीला पळवून नेत प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने भावोजीची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना नंदुरबारमध्ये घडली आहे.
नंदुरबार शहरातील अतिशय वर्दळीचा समजल्या जाणाऱ्या मच्छी बाजार परिसरालगत काल रात्री उशिरा ही घटना घडली. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत जिल्हा पोलीस अधिक्षकांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. दरम्यान घटनेनंतर आरोपी हा स्वत: पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. खबरदारीचा उपाय म्हणून नंदुरबारमध्ये आज अतिरिक्त कुमक घेऊन मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
नंदुरबार शहरातील मच्छी बाजार चौकात राहणाऱ्या एका मुलीने दोन वर्षांपूर्वी प्रेम विवाह केला होता. त्यानंतर ती मुलगी आपल्या पतीसोबत राहत होती. मात्र भावाच्या मनातील राग गेला नव्हता. याच रागातून भावाने बहिणीच्या नवऱ्याला मच्छी बाजार परिसरात गाठले. धारदार शस्त्राने भोसकून भावोजीची हत्या केली. हत्या केल्यानंतर तरुणाने पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी भावाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावपुर्ण वातावरण आहे. नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.