“विश्वासघात ही काँग्रेसची…”, धाराशिवमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल…

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (30 एप्रिल) महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यासाठी धाराशिवमध्ये सभा घेतली. या सभेत त्यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर निशाणा साधत जोरदार टीका केली.

धाराशिव : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (30 एप्रिल) महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेसाठी धाराशिव येथे आले होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार अभिमन्यू पवार, आमदार राजाभाऊ राऊत, आमदार ज्ञानराज चौघुले, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण असे मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रचार सभेला संबोधित करत असताना मोदींनी इंडिया आघाडीसह काँग्रेसवर जोरदार टीका केली.
इंडिया आघाडीसह काँग्रेसवर टीका : विश्वासघात ही काँग्रेसची ओळख असल्याचं सांगत मोदींनी काँग्रेसवर टीकेची तोफ डागली. पुढं इंडिया आघाडीवर टीका करत, इंडिया आघाडीत 272 जागांवर दावा सांगणारा एकही पक्ष नाही, त्यामुळं त्यांच्या मोठमोठ्या बोलण्याला अर्थ नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून विरोधी आघाडी बनावट व्हिडिओ बनवून लोकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहे, असंही मोदी म्हणाले.

पुढं ते म्हणाले की, 2014 पूर्वी काँग्रेसनं केवळ 12 हजार कोटी रुपयांच्या डाळी आणि तेलबियांची खरेदी केली होती, तर 2014 नंतर नरेंद्र मोदी सरकारनं 1.25 लाख रुपयांच्या डाळी आणि तेलबियांची खरेदी केली. मराठवाड्यातील 26 सिंचन प्रकल्प काँग्रेसनं दीर्घकाळ रखडवले होते, पण आमच्या सरकारनं सत्तेत येताच कामं सुरू केली. मराठवाड्यातील पाणीप्रश्नासाठी काँग्रेस सरकार आणि विरोधी आघाडीच जबाबदार आहे. तसंच राज्यातील जलयुक्त शिवारसारख्या योजना बंद करणाऱ्यांना जनतेकडं मतं मागण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारनं जलयुक्त शिवार योजना सुरू केली होती, जी नंतर उद्धव ठाकरे सरकारनं बंद केली. कोरडवाहू भागात पुरेसा पाणीपुरवठा आणि पाणीसाठा हे या योजनेचं उद्दिष्ट होतं. पूर्वी धाराशिव येथून एकच रेल्वे धावत होती, आता दोन डझनहून अधिक गाड्या धावताय.’ तसंच प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत आतापर्यंत देशभरातील शेतकऱ्यांना 3 लाख कोटी रुपये देण्यात आले असून त्यापैकी धाराशिवला 800 कोटी रुपये मिळाले असल्याचंही मोदींनी यावेळी सांगितलं.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page