
बीड- वनचक्की कंपनीला दोन कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेले वाल्मिक कराड यांना मोक्का लावण्यात आला आहे. त्यानंतर परळीमधील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. कराड यांचे समर्थक हे आक्रमक झाले आहेत. त्यात आता वाल्मिक कराडची पत्नी मंजली कराड यांनी आमदार सुरेश धस यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.
एसआयटीचे प्रमुख आयपीएस अधिकारी बसवराज तेली हे आष्टीचे जावई आहेत. त्यांचे आणि धस हे एकमेंकाच्या संपर्कात आहे. दोघांचे सीडीआर काढून ते तपासावे, अशी मागणीच मंजली कराड यांनी केलीय. तर मूळच्या आष्टीच्या असलेल्या आयएएस अधिकारी शितल उगले यांचे ते पती आहेत. यांनी एसआयटीचे प्रमुख म्हणून जावईचे आणून बसविले आहेत. शितल उगले यांचे मामा जिल्हाधिकारी होते. त्यांचे आजोबा हे आष्टीमध्ये तहसील क्लार्क होते. त्यातून धसांची येथे मनमानी चालू असल्याचे दिसून येत आहे. धसांनी आपल्या सोईनुसार येथे त्यांचे माणसे आणून बसविले असल्याचा आरोप मंजली कराड यांनी केलाय.
एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली आणि सुरेश धस हे पंधरा दिवसांपासून एकमेंकाच्या संपर्कात आहेत. तुम्हाला सीडीआर काढण्याची खूप हौस आहे तर या दोघांचे काढावेत. ते माझ्या पतीला अडकविण्यासाठी प्लॅनिंग करतायत, असा आरोप मंजली कराड यांनी केलीय. एसआयटीचे तपासी अधिकारी बसवराज तेली आणि इतर आठ लोकांना एसआयटीमधून काढून टाकावे. कुणाचे नातेवाईक नसलेले, जवळचे नसलेले अधिकाऱ्यांची एसआयटीमधून नियुक्ती करावी, अशी मागणी कराड यांनी केलीय.
दोन मंत्री आणि माझ्या पतीला संपविण्याचा धसांचा डाव आहे. त्यांना फक्त वंजारी समाजाची माती करायची आहे, दोन्ही मंत्री त्यांना नको आहेत. जे चाळीस वर्षात घडलेले नाही. ते आता घडले आहे. त्यामुळे हे त्यांच्या डोळ्यात खुपत आहे. त्या लोकांना कमी करण्यासाठी माझ्या माझ्या पतीला टार्गेट करण्यात आले आहे. सुरेश धस यांना निवडून आणण्यासाठी माझ्या पतीने मदत केली आहे. सुरेश धस यांना मंत्री, पालकमंत्री होण्याची इच्छा होती. त्यांनी दोन मंत्र्यांना संपविण्यासाठी आणि माझ्या पतीला संपविण्यासाठी हे सुरु आहे. जातीय समीकरण जोडून माझ्या पतीला बळीचा बकरा बनविला आहे.
वाल्मीक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड पुढे म्हणाल्या की, खंडणी आणि हत्या प्रकरणात माझ्या पतीचा कुठलाही सहभाग नाही. केवळ राजकारणातून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. समोरील लोक मराठा समाजाचा आधार घेऊन आंदोलने करत आहेत. पण मी पण मराठ्याचीच आहे. मी पण ९६ कुळी आहे. मी माझ्या जातबांधवांना सांगू इच्छिते, की वंजारीसारख्या छोट्या जातीला कशाला टार्गेट करता? त्यांना लक्ष्य करू नका. गुन्हेगाराला कोणतीही जात नसते.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी खंडणीच्या गुन्ह्यात सीआयडीच्या ताब्यात असलेला आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आरोपी वाल्मीक कराड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केल्यावर काल दिवसभर कराड समर्थकांनी परळीत आंदोलने सुरू केली असून पोलीस ठाण्यासमोर ठिय्या सुरू केला आहे. यावेळी अनेक जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. या आंदोलन स्थळावर एका कार्यकर्त्याने स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यात या कार्यकर्त्याला पायाला चांगलेच भाजले आहे. तात्काळ त्यास उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पेटवून घेणाऱ्या कराड समर्थकाचे नाव दत्ता जाधव (रा. फुलेनगर) असल्याचे समजते. तर हृदयविकाराचा त्रास झालेला कराड समर्थक हा परळीतील मलिकपुरा येथील एजाज शेख नावाचा कार्यकर्ता आहे.