रत्नागिरी : रत्नागिरी सह राज्यातील शासकीय तंत्रनिकेतन मधील शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. या समस्येवर दोन तीन तोडगे काढण्यात आले असून लवकरच शिक्षक उपलब्ध होतील व विद्यार्थ्यांचे शिक्षण चांगल्या रितीने सुरू राहील, याबाबत आज सायंकाळी रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, तंत्रशिक्षण संचालक श्री. मोहितकर व अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे हा प्रश्न लवकरच सुटेल असे बाळ माने यांनी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले.
दोन दिवसांपूर्वी बाळ माने यांनी रत्नागिरीतील शासकीय तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांची समस्या जाणून घेतली. काही शिक्षकांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे भरतीला स्थगिती मिळाली आहे. ही बाब न्यायप्रविष्ठ आहे. राज्याचे मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व स्थगिती उठवण्यासंदर्भात पहिला पर्याय म्हणून विद्यार्थ्यांच्या वतीने पालक म्हणून खंडपीठाकडे याचिका मांडण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. अॅडव्होकेट जनरल यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य मांडणी करून कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन चंद्रकांतदादांनी दिल्याचे बाळ माने यांनी सांगितले..
एमपीएससीच्या माध्यमातून पद भरती केली जाणार आहे. ही प्रक्रिया जलद गतीने करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. तसेच यापूर्वी तंत्रनिकेतनमध्ये १५ विद्यार्थ्यांमागे एक प्राध्यापक असत. आता हा नियम २५ विद्यार्थ्यांमागे एक प्राध्यापक असे झाला आहे. त्यामुळे मोठ्या शहरांतील पॉलिटेक्निकमध्ये अतिरिक्त ठरणाऱ्या प्राध्यापकांना जवळच्या जिल्ह्यात विनंती करून पाठवण्यात येणार आहे. हा चांगला निर्णय असून यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहील. यासंदर्भातील प्रक्रिया करण्याचे आश्वासनही चंद्रकांत दादांनी दिले आहे.
आजच्या चर्चेप्रसंगी दादांचे स्वीय सहायक अतुल खानोलकर यांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता प्रयत्न करूया, असे सांगितले, असे बाळ माने यांनी बोलताना सांगितले..
आजच्या बैठकीला युवा नेते मिहीर माने, तंत्रशिक्षण संचालक तसेच अधिकारी उपस्थित होते.