औरंगजेबाने जेवढे लोक त्याच्या काळात मारले, त्यापेक्षा अधिक लोक आज राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाने मरत आहेत; माजी आमदार बच्चू कडू यांचा घणाघात…

Spread the love

दिव्यांग, शेतकऱ्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात रायगडाच्या पायथ्याला पाचाड येथे अन्नत्याग आंदोलन सुरू


 
महाड- प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून (२१ मार्च) दिव्यांग मंत्रालयाचे माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात तीन दिवस अन्नत्याग आंदोलन रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारी सुरू करण्यात आले आहे.

यावेळी आंदोलनाचे संयोजक व प्रहार जनशक्ती पार्टीचे सचिन साळुंखे, ओंकार साळुंखे, प्रहार अपंग क्रांती संस्थेचे महाराष्ट्र सचिव सुरेश मोकळ, राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव, रायगड जिल्हा अध्यक्ष सुनील गणबोडे, महाराष्ट्र संपर्कप्रमुख रामदास खोत, अभियान प्रमुख महेश बडे आदी उपस्थित होते. राज्यभरातील दिव्यांग मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत. यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले, “आज देशात आणि राज्यात धर्म आणि जातीपातीचे घाणेरडे राजकारण केले जात आहे. सरकारला नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक धर्माच्या लोकांना पोट असते आणि त्याकरिता सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. औरंगजेबाने त्याच्या काळात जेवढे लोक मारले नसतील, त्यापेक्षा अधिक लाखो शेतकऱ्यांनी राज्यात सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या केल्या आहेत. परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. औरंगजेबाने तलवारीच्या टोकावर लोकांना मारले. मात्र, सध्याचे राज्यकर्ते हे त्यांच्या विविध धोरण, कलमाने मारत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरकारने धर्म, जात यावर राजकारण करण्यापेक्षा नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत.

माजी आमदार बच्चू कडू पुढे म्हणाले, सर्वत्र महागाई वाढलेली असून दिव्यांगांना मागील चार महिन्यापासून कोणतेही मानधन मिळत नाही. त्यांचे जीवन असह्य झाले आहे. याबाबत सरकार कोणतीही दखल घेताना दिसत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा शेतीच्या शेतमालास योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झालेला आहे. लाडकी बहीण नाममात्र असून, राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी, मजूर, दिव्यांग, कामगार यांच्यासाठी कोणतीही विशेष तरतूद न करता केवळ अनुदान कपातीचे धोरण आखले जात आहे. दिव्यांग मंत्रालय निर्माण करण्यात येऊन १४०० कोटींची तरतूद करण्यात आली. मात्र, त्यापैकी १२०० कोटी रुपये केवळ पगारावर खर्च केले जात आहे. मुबलक निधी नसेल, तर दिव्यांग मंत्रालय कशाप्रकारे काम करणार हे सरकारने स्पष्ट करावे. श्रम, मूल्य आधारित मोबदला लोकांना मिळत नसून, केवळ राजकीय लाभासाठीच्या योजना सध्या सुरू आहे. औरंगजेबाची कबर, दिशा सॅलियन प्रकरणातून नेमका कोणाचा फायदा होणार आहे. त्यामुळे निरर्थक गोष्टी दाखवण्यापेक्षा योग्य गोष्टी दाखवल्या तर लोकांना समाधान मिळेल.

सचिन साळुंखे म्हणाले, “स्वराज्याच्या राजधानीवरून राज्याच्या राजधानीला इशारा देण्यासाठी हे प्रतीकात्मक आंदोलन आहे. दिव्यांगांना, कर्जमाफी, त्यांना दरमहा ६००० रुपये मानधन, स्वतःचे घर व स्वाभिमानाने जीवन जगण्याची संधी, स्वयंरोजगारासाठी दिव्यांगांना स्टॉल, दिव्यांगांसाठी राष्ट्रीय बँक निधी, दिव्यांग उद्योजकांसाठी धोरण, प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन, अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी द्यावा, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आहे. तसेच २३ मार्च रोजी शहीद दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर देखील आयोजित करण्यात आले आहे. सकाळी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या समाधीस्थळापासून माजी आमदार बच्चू कडू यांनी आपल्या सहकारी पदाधिकाऱ्यांसह दिव्यांग बंधू-भगिनींच्या समारंभ स्थळापर्यंत पायी मोर्चा काढला सभामंडपात दीपप्रज्वलन भारत माता पूजन व तिरंगा झेंड्याचे पूजन करून तीन दिवशी आंदोलनाची सुरुवात झाली राज्यातील सर्व जिल्ह्यांतून दिव्यांग बंधू-भगिनी मोठ्या संख्येने आंदोलनाला उपस्थित असल्याचे सांगण्यात आले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page