लष्कराच्या वाहनांवर हल्ला, ५ जवान
शहीद; PFF ने घेतली जबाबदारी

Spread the love

जम्मू :- गुरुवारी सशस्त्र दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. यामध्ये पाच जवान शहीद झाले असून दोन जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी पीएफएफने घेतली आहे.
लष्कर-ए-तैयबा (एलईटी) ची पाकिस्तानस्थित शाखा पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (PFF) ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. लेफ्टनंट कर्नल सुनील बारटवाल यांनी सांगितले की, दहशतवाद्यांबाबत मिळालेल्या भक्कम गुप्त माहितीच्या आधारे बुधवारी रात्री पूंछ जिल्ह्यातील ढेरा की गली भागात संयुक्त शोध मोहीम राबवण्यात आली. सैनिक घटनास्थळाकडे जात असताना दहशतवाद्यांनी दोन वाहनांवर गोळीबार केला.
या हल्ल्याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत पाच जवान शहीद झाले असून दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहीम सुरूच असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या जवानांवर हल्ला झाला त्यांची शस्त्रे दहशतवाद्यांनी पळवून नेली असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ऑपरेशन सुरू असताना, अधिकारी अधिक माहिती गोळा करण्याचा आणि परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या हल्ल्याच्या काही आठवड्यांपूर्वी, जवळच्या राजौरी जिल्ह्यातील बाजीमल वनपरिक्षेत्रातील धरमसाल पट्ट्यात गोळीबारात दोन कॅप्टनसह पाच लष्करी जवान शहीद झाले होते.
नोव्हेंबरमध्ये राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत अफगाणिस्तान-प्रशिक्षित लष्कर-ए-तैयबा कमांडर क्वारीसह दोन दहशतवादी मारले गेले. राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या ढेरा की गली आणि बुफलियाज दरम्यानचा भाग घनदाट जंगलाने व्यापलेला आहे आणि तो चमरेर जंगल आणि नंतर भाटा धुरियन जंगलाकडे जातो, तिथे या वर्षी २० एप्रिल रोजी लष्कराच्या वाहनावर हल्ला झाला होता.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page