काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची शोधाशोध करणाऱ्या काँग्रेसमध्ये विधानसभेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी होताना दिसून येत आहे.
नाशिक : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीला भरघोस यश मिळालं, यात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यात. त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची शोधाशोध करणाऱ्या काँग्रेसमध्ये विधानसभेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी होताना दिसून येत आहे.
64 इच्छुकांनी मुलाखती दिल्यात-
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे विधानसभेतही काँग्रेसला महाविकास आघाडीत चांगले यश मिळेल, अशा आशेने आता काँग्रेसमधून लढण्यासाठी अनेकांनी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी नाशिकच्या मध्य मतदारसंघातून काँग्रेसकडून कोण लढणार अशी चर्चा सुरू होती, यावेळी मात्र मतदारसंघातून लढण्यासाठी काँग्रेससह मित्र पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडून चाचपणी करण्यात येत असून, जिल्ह्यात एक आमदार असताना 15 पैकी 7 जागांवर काँग्रेसने दावा केलाय. यासाठी तब्बल 64 इच्छुकांनी मुलाखती दिलेत. यात प्रामुख्याने शहरातील मध्य, पूर्व हे दोन मतदारसंघ काँग्रेस पक्षाला हवे आहेत, याशिवाय ग्रामीणमधील मध्य मालेगाव, नांदगाव, इगतपुरी, चांदवड, येवला या मतदारसंघांचा समावेश आहे.
आमदार खोसकर काँग्रेसमध्येच-
इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्या उमेदवारीविषयी यंदा उत्सुकता होती, विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंगचा आमदार खोसकर यांच्यावर संशय असल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी यासंदर्भात जाहीररीत्या संशय व्यक्त केला होता, दरम्यान आमदार खोसकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या शिंदेसेनेच्या प्रवेशाच्या चर्चा देखील पसरल्या होत्या, तर दुसरीकडे खोसकर यांनी त्याचा इन्कार करत आपण काँग्रेसमध्ये असल्याचा दावा केला होता. आता त्यांनी पुन्हा काँग्रेसकडे उमेदवारी मागितल्याने खोसकर हे काँग्रेसमध्ये असल्याचे स्पष्ट झालंय.
नाशिक मध्य मतदारसंघात सर्वाधिक इच्छुक उमेदवार…
नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून सर्वाधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्यात, यात पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, युवा जिल्हाध्यक्ष गौरव पानगव्हाणे, माजी महापौर दशरथ पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड, प्रदेश सरचिटणीस राहुल दिवे, काँग्रेस प्रवक्ते डॉ. हेमलता पाटील, शाहू खैरे, गुलजार कोकणी, भालचंद्र पाटील, अजिनाथ नागरगोजे यांचा समावेश आहे.