महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर दोन दिवसात निर्णय घेऊ, असं अशोक चव्हाण म्हणाले होते. मात्र, आजच ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती खुद्द चव्हाण यांनीच दिलीय.
मुंबई- अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. अशोक चव्हाण हे आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपा प्रदेश कार्यालयात दुपारी अशोक चव्हाण भाजपामध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. त्यासाठी भाजपाच्या कार्यालयात जय्यत तयारी सुरू आहे. अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश हा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
विकासासाठी काम करणार….
अशोक चव्हाण हे आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांनीच याबाबत अधिकृत माहिती दिली. “माझ्या राजकीय करियरची आजपासून नवीन सुरुवात होतेय. महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही काम करू,” अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.
अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी?…
अशोक चव्हाण यांना भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. कारण, अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश आधी 15 फेब्रुवारी रोजी होणार होता. पण अचानकपणे त्यांचा पक्ष प्रवेश आजच होत आहे. राज्यसभेसाठी नामांकन देण्याची अखेरची तारीख एका दिवसावर आलीय. त्यामुळं चव्हाण राज्यसभेवर जाण्याच्या चर्चा सुरू आहेत.
अशोक चव्हाण यांच्या मुलीला विधानसभेची उमेदवारी?
अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना भाजपाकडून विधानसभेची उमेदवारी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवून त्यांची मुलगी श्रीजया यांना विधानसभेवर घेण्याचा प्लॅन भाजपाकडून तयार झाला असल्याची माहिती मिळत आहे. तसंच राज्यात भाजपाचं सरकार आल्यास श्रीजया यांना मंत्रीपदही मिळणार असल्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अजूनही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
काँग्रेस पक्षाला दिली सोडचिठ्ठी : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडली. अशोक चव्हाण यांचे वडील, माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांनी राज्यात काँग्रेस वाढवली होती. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत अशोक चव्हाण यांनीही काँग्रेससाठी अहोरात्र काम केलं. आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम केलाय. त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलाय. अशोक चव्हाण आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.
चव्हाण गेले म्हणून मी जाईन यात तथ्य नाही – विजय वडेट्टीवार…
अशोकराव चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यासोबत आणखी काही आमदार जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचंही नाव असून यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणाले, “अशोक चव्हाण यांचा राजीनामा धक्कादायक असून त्यांनी अचानक का निर्णय घेतला हे आपल्याला माहिती नाही. त्यांची माझ्याशी चर्चा झाली नाही. मी 2007 पासून त्यांच्याबरोबर काम केलं आहे. म्हणून कदाचित चर्चा होते ते गेले म्हणून विजय वडेट्टीवार जातील, पण त्यात तथ्य नाही.”