मुंबई- लोकसभा निवडणुकांच्या आधीच राज्याच्या राजकारणात मोठ्या भूकंपाचे संकेत आजच्या घडामोडींनी दिले आहेत. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा तसेच आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यावर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून पक्षामध्ये मी कोणावरही नाराज नाही, माझे कोणाशीही मतभेद नाहीत, तसेच भाजपमधील प्रवेशाबाबत अद्याप निर्णय घेतला नसून येत्या दोन दिवसात आपण राजकिय भुमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
मी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वचा तसेच आमदारकीचा राजीनामा दिला. आत्तापर्यंत काँग्रेस पक्षामध्ये प्रामणिकपणे काम केले. मला पक्षातील कोणाचीही तक्रार करायची नाही. पक्षाने मला काही दिले, मी सुद्धा पक्षाला खूप दिले, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. तसेच अद्यापही भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. येत्या दोन दिवसांत याबद्दलची भूमिका स्पष्ट करेन,” असे महत्वाचे विधानही अशोक चव्हाण यांनी केले आहे.
यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांबाबत महत्वाचे विधान केले आहे. मी घेतलेली भूमिका एकट्याची आहे. मी अद्याप कोणत्याही आमदाराला संपर्क केला नाही, मात्र कोण काय करतील हे मी सांगू शकत नाही, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले कि, काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे.