भायखळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रुग्णवाहिका चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जाणून घ्या, यामागील कारण.
मुंबई : आपण अनेकदा रुग्णवाहिकेचा सायरन वाजवून चालकाला ट्रॅफिकमधून वाट काढताना पाहिलं असेल. मात्र, अनेकदा रुग्णवाहिकेत रुग्ण नसतानाही सायरन वाजवला जातो. अशाच एका प्रकरणात भायखळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनाकारण रुग्णवाहिकेचा सायरन वाजवल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भायखळा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा परब यांनी ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना यासंदर्भात माहिती दिलीय.
नेमकं काय घडलं? :
बुधवारी (17 जुलै) मोहरमनिमित्त भायखळा परिसरात मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत शेकडो लोक सहभागी झाले होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एमएच-01-डीआर-0374 क्रमांकाची रुग्णवाहिका भायखळ्यातील महाराणा प्रताप चौकातून अफझल हॉटेलच्या दिशेनं मोठ्या आवाजात सायरन वाजवत लोकांच्या गर्दीतून वाट काढत गेली. इतकंच नाही तर चालकानं रुग्णवाहिका विरुद्ध दिशेनं वळवली. मिरवणुकीमुळं कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकांना जाण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. मात्र, रुग्णवाहिकेत रुग्ण नसल्याचा पोलीस कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता चालकानं योग्य उत्तर दिलं नाही.
चालकाला अटक न करता त्याच्यावर गुन्हा दाखल करून 41(अ)ची नोटीस देऊन सोडून देण्यात आलंय. – मंजुषा परब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भायखळा पोलीस ठाणे
चालकाविरोधात गुन्हा दाखल :
रुग्णवाहिका चालक अली हुसैन अब्बास इलेक्ट्रिकवाला (वय 34, रा. माझगाव) याच्याविरुद्ध बेदरकारपणे वाहन चालवून स्वत:चा आणि निष्पाप लोकांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या कलम 108, 119, 177, 194 आणि भारतीय न्याय संहिता कलम 125, 281 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.