
ठाणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण आंदोलन केले. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाने मोर्चे, सभा घेऊन आरक्षणाच्या मागणीचा जोर लावून धरला. याची दखल घेत राज्यभरात कुणबी नोंदींचा शोध घेण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील प्रांत, तहसील कार्यालयांच्या माध्यमातून नोंदी तपासण्याचे काम हाती घेतले असून ठाणे तहसील कार्यालय क्षेत्रात दोन हजार ८५४ कुणबी नोंदी आढळून आल्या असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

मनोज जरांगे पाटील यांनी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी केली आहे. त्यांच्या मागणीची दाखल घेत, राज्य सरकारने कुणबी नोंदणी शोधण्याचे निर्देश दिल्यानंतर राज्यभरात कुणबी नोंदणी शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.त्यानुसार ठाणे जिल्ह्यातदेखील कुणबी नोंदणी शोधमोहीम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून सुरू आहे. ५ नोव्हेंबर २०२३ पासून ठाणे तहसीलदार कार्यालयामार्फत विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून यामार्फत कुणबी-मराठा नोंदी पडताळणीचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी आदी ७० अधिकारी-कर्मचारी सध्या कुणबी नोंदीचा शोध घेत आहेत.
त्यानुसार आतापर्यंत ठाणे तहसीलदार कार्यक्षेत्रातील १५ लाख ३६ हजार दस्तावेज तपासण्यात आले. यामध्ये दोन हजार ८५४ कुणबी नोंदी आढळून आल्या असल्याची माहिती नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी दिली. कुणबी-मराठा जातीचे पुरावे शोधण्याचे काम ठाणे तहसील कार्यालयामार्फत सुरू आहे. यामध्ये सात-बारा, फेरफार, पीक पाहणी उतारे, गाव नमुना नंबर १४, जन्म-मृत्यू नोंदी, अधिकार अभिलेख नोंदी, कुलाचार नोंदी आदी सर्व प्रकारचे दाखले तपासण्यात येत आहेत. – दिनेश पैठणकर, नायब तहसीलदार, ठाणे