
पुणे- अंबिका मसालेच्या प्रवर्तक कमल परदेशी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी आज मंगळवारी दुपारी पुण्यातील ससून रूग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या कँन्सरशी झुंज देत होत्या. त्यांची कँन्सरशी झुंज आज अपयशी ठरली आहे. त्यांना रक्ताचा कँन्सर होता. स्वतः निरक्षर असूनही बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी अंबिका उद्योग समूह उभारला आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खुटबाव या त्यांच्या गावी २००० साली बचत गटातील महिलांना एकत्रित करत त्यांनी अंबिका मसाले हा ब्रँड तयार केला होता. स्वतः निरक्षर असूनही त्यांनी आपल्या मसाल्याचे मार्केटिंग जगभरात केले. आपल्या मसाला उत्पादन कंपनीच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांच्या हाताला काम देत कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली होती. त्यांना आदर्श उद्योजिका सहित अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. जर्मनीच्या चांसेलार अँगेला मर्केल यांनीही कमलताईंच्या कामाचं कौतुक केलं. कमल परदेशी यांचा शेतमजूर ते कोट्यवधींची उलाढाल असलेल्या अंबिका मसाले कंपनीच्या चेअरमन असा थक्क करणारा प्रवास आहे. शेतमजूर असणाऱ्या मलताई परदेशी यांनी मजुरीच्या पैशातून मसाला व्यवसाय सुरू केला. कमल यांनी आपल्या झोपडीतूनच मसाल्याच्या उद्योगाची सुरुवात केली होती. आता त्यांचे मसाले भारतातील लहान मोठी दुकाने तसेच मोठमोठ्या मॉलसोबतच परदेशी बाजारपेठांतही विकले जातात.
कमल परदेशी यांनी बचत गटाच्या माध्यमातून अंबिका महिला औद्योगिक सहकारी संस्थेची स्थापना केली होती. त्यांनी ग्रामीण भागातील महिलांना मसाले बनविण्याच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. कमल परदेशी व महिलांनी सुरुवातीला पुण्यातल्या सरकारी कार्यालयाबाहेर मसाले विकले. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर मुंबईतल्या प्रदशर्नांमध्ये आणि मग बिग बाझारमध्ये मसाल्यांची विक्री केली. आता अंबिका मसाल्यांना देशभरात मोठी मागणी आहे. त्याचबरोबर जर्मनीतही त्यांच्या मसाल्यांना मोठी मागणी आहे. कमलताई परदेशी यांनी स्वत:चा मसाल्याचा आज ब्रँड तयार केला आहे. मात्र, एवढा मोठा पल्ला गाठूनही त्यांच्या साधेपणाचे कायम कौतुक होत असे. कारण कमलताईंनी आपल्या सहकारी महिलांना चांगली घरं बाधून दिली मात्र त्या आजही साध्या घरात राहत होत्या. घर ते फॅक्टरी हा प्रवास त्या रोज पायी करत होत्या.