अधिवेशन संपवून अजित पवार मस्साजोगमध्ये दाखल:संतोष देशमुख कुटुंबियांचे केले सांत्वन, दोषींना सोडणार नसल्याची दिली ग्वाही…

Spread the love

बीड/ मस्साजोग – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्य हादरले होते. या घटनेला 13 दिवस उलटून गेले आहेत. संतोष यांच्या तेराव्याच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील मस्साजोगमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येमागील मास्टरमाइंडला सोडणार नाही. दोषींना शिक्षा दिली जाईल, असे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिले.

अधिवेशन संपताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबियांशी चर्चा करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. ही घटना फार वेदनादायी, माणुसकीला काळीमा फासणारी आहे. संतोष यांच्या हत्येची न्यायालयामार्फत तसेच कुणाचाही दबाव येऊ नये, यासाठी आयजी लेव्हलच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फतही चौकशी करत आहोत, असे अजित पवार यांनी देशमुख कुटुंबियांना सांगितले.

*मुलांच्या शिक्षणाची घेणार जबाबदारी…*

संतोष देशमुख यांचे मारेकरी तसेच या मागचा मास्टरमाइंड कोणीही असला, तरी त्यांना सोडणार नाही. तुम्ही अजिबात घाबरू नका. वेळ पडल्यास तुम्हाला पोलिस बंदोबस्त देऊ, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. शिवाय त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायला आपण तयार असल्याचे अजित पवार यावेळी म्हणालेत.

*मी स्वत: लक्ष देईल, अजित पवारांचा शब्द…*

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील तपासात कुठल्याही परिस्थितीत राजकीय हस्तक्षेप होणार नाही. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होऊन दोषींना फाशीची शिक्षा होईल. या मागील मास्टरमाइंड जो कुणी असेल, त्याला सोडणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्रामस्थांशी बोलताना दिले. या प्रकरणात वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. त्यातून कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण प्रकरणावर सरकारचे आम्हा सर्वांचे बारकाईने लक्ष आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास होईपर्यंत मी व्यक्तीश: त्याठिकाणी लक्ष देईन आणि कुणालाही सोडले जाणार नाही, अशी खात्री अजित पवार यांनी मस्साजोग ग्रामस्थांना दिली.

*देशमुख हत्याकांडाची पार्श्वभूमी काय?..*

गत 6 डिसेंबर रोजी प्रतिक घुलेसह इतर काही लोकांनी मस्साजोग भागात होणाऱ्या एका खासगी कंपनीच्या प्रकल्पस्थळी येऊन सुरेश सोनवणे व प्रकल्प अधिकारी शिवाजी शिंदे यांना जबर मारहाण केली होती. त्यांच्यावर सदर कंपनीकडून 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या मारहाणीनंतर मस्साजोगचे रहिवाशी असणाऱ्या वॉचमन अशोक सोनवणे यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर 6 तारखेलाच केज पोलिस ठाण्यात घुलेंसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर 3 दिवसांनी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page