नवी दिल्ली : अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ यांच्यात शारजाहमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. अफगाणिस्ताननं पहिल्या दोन सामन्यात आफ्रिकेला पराभूत करुन एकदिवसीय मालिका जिंकली आहे. अफगाणिस्ताननं दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाला पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मालिका जिंकत रचला इतिहास-
मालिकेतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्ताननं आफ्रिकेला 106 धावांत ऑलआउट केलं आणि 26 षटकांत सामना जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्ताननं पुन्हा एकदा शानदार कामगिरी करत 311 धावा केल्या आणि आफ्रिकेला 134 धावांत गुंडाळत 177 धावांनी सामना जिंकला.
अफगाणिस्तान क्रिकेट संघाला नाही घरचं मैदान-
अफगाणिस्तान क्रिकेट संघ त्यांच्या देशातील सुरक्षेच्या कारणास्तव दीर्घकाळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकलेला नाही. कारण या देशात दुसरा कोणताही संघ जाण्यास तयार नाही, तर काबूलमध्ये देशांतर्गत सामने होतात आणि अफगाणिस्तानचे मोठे खेळाडूही या स्पर्धेत भाग घेतात. आयसीसीचे सदस्य देश काबूलला जाणे टाळतात, त्यामुळं अफगाणिस्तान क्रिकेट संघ कधी भारतात तर कधी दुबई आणि शारजाह इथं इतर संघांविरुद्ध सामन्यांचं आयोजन करतो.
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचं भारतात होम ग्राउंड-
सुरक्षेच्या कारणास्तव, अफगाणिस्तान क्रिकेट संघानं सुरुवातीला शारजाह इथं सराव केला आणि तिथं आपले सामने खेळले. पण जेव्हा भारत-अफगाणिस्तान संबंध सुधारु लागले, तेव्हा हमीद करझाई सरकारनं अफगाणिस्तानच्या खेळाडूंना क्रिकेट खेळण्याची परवानगी देण्यासाठी 2015 मध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात करार केला. ज्याअंतर्गत ग्रेटर नोएडा क्रिकेट स्टेडियम हे अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे होम ग्राउंड म्हणून देण्यात आलं. परंतु, ते त्यांचं कायमचं घरचं मैदान नाही. तेव्हापासून अफगाणिस्तान क्रिकेट संघ भारतात सराव करतो आणि इतर देशांसोबत सामनेही खेळतो.
अजय जडेजाच्या प्रशिक्षक काळात झाली संघात सुधारणा-
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे पहिले प्रशिक्षक माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू कबीर खान होते. त्यांच्यानंतर इंझमाम-उल-हक, रशीद लतीफ आणि उमर गुल यांसारख्या मोठ्या खेळाडूंनीही अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद भूषवलं आहे. पण त्याच्या कोचिंग स्टाफमध्ये अनेक माजी भारतीय खेळाडू आहेत. त्यानंतर अजय जडेजानं अफगाणिस्तानच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली, त्यानंतर 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत संघाची शानदार कामगिरी पाहायला मिळाली.
तालिबानच्या काळातही भारत-अफगाणिस्तान क्रिकेटवर पडला नाही कोणताही प्रभाव-
अफगाणिस्तानातील अश्रफ घनी यांचं सरकार कोसळल्यानंतर भारताचे अफगाणिस्तानशी संबंध पूर्वीसारखे राहणार नाहीत, असं मानलं जात होतं. पण तालिबान सत्तेत परतल्यानंतरही, भारतानं अफगाणिस्तानशी चांगले संबंध ठेवले, ज्याचा क्रिकेटवरही परिणाम झाला आणि अफगाण क्रिकेटला मदत केल्याबद्दल तालिबाननं अनेक प्रसंगी बीसीसीआयचे आभारही मानले.
बीसीसीआय करते करोडोंची मदत-
भारतानं अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटच्या मैदानांच्या निर्मितीसाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली असून अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटच्या विकासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी भारत नेहमीच प्रयत्नशील असतो, हे विशेष. या कारणास्तव बीसीसीआयनं आता अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाला नोएडा व्यतिरिक्त कानपूर आणि डेहराडूनच्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळण्याची ऑफर दिली आहे.
सर्व मोठ्या संघाला केलं पराभूत-
अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या कामगिरीत गेल्या काही वर्षांत खूप सुधारणा झाली आहे. अफगाणिस्तान बोर्ड याचं श्रेय भारताच्या बीसीसीआयला देतं. त्यामुळं पाकिस्तानचे अनेक खेळाडू अफगाणिस्तानवर टीका करतात की, आम्ही त्यांना क्रिकेट शिकवले आणि आता ते आमच्या शत्रूचं कौतुक करतात. एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये अफगाणिस्तान क्रिकेट संघानं चमकदार कामगिरी केली आहे, तर 2024 टी-20 विश्वचषक स्पर्धेत या संघानं उपांत्य फेरी गाठून इतिहास रचला होता. यासह, नवीन उदयोन्मुख संघानं भारत वगळता सर्व आयसीसी सदस्य देशांना पराभूत केले आहे, जी संघाच्या यशाची हमी आहे.