मानसिक, शारीरिक स्वास्थ्यासाठी पुरेशी झोप, नियमित व्यायाम, ध्यानधारणा अन् संवाद हवा..

Spread the love

समुपदेशनसाठी 14416 टेलि-मानस टोल फ्री क्रमांक 24 X 7

रत्नागिरी, दि. 28 (जिमाका) : मानसिक तसेच शारीरिक स्वास्थ्य सक्षम बनविण्यासाठी पुरेशी चांगली झोप, नियमित व्यायाम, ध्यानधारणा, समाजाशी संपर्क अन् संवाद, डीजीटल मीडिया आणि उत्तेजक मादक पदार्थांचा कमी वापर या सोप्या पायऱ्यांचा दररोज अवलंब करा. मानसिक आरोग्यासाठी सहाय्य व समुपदेशनासाठी 14416 हा टेलि-मानस टोल फ्री क्रमांक 24 तास कार्यरत आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक मनोरुग्णालयाचे मानसोपचार सल्लागार डॉ. संजयकुमार कलकुटगी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा शासकीय रुग्णालयाच्यावतीने अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत ताण-तणाव व्यवस्थापन सत्राचे नियोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक भास्कर जगताप, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे आदी उपस्थित होते.

मानसोपचार सल्लागार डॉ. कलकुटगी यांनी संगणकीय सादरीकरण करुन ताण कशामुळे येतो, तो कमी करण्यासाठी काय उपाय योजना आहेत, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. नियमित व्यायाम करणाऱ्यांना मानसिक समस्यांचे ओझे कमी असते. मद्यपान आणि उत्तेजक पदार्थांच्या दुरुपयोगाने मानसिक समस्या वाढतात. त्यांच्यावर अवलंबून राहण्याचे नकारात्मक चक्र तयार होते. योगक्रिया, आसने, प्राणायाम आणि ध्यान यामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारते. कुटुंबातील सदस्य, मित्र परिवार आणि स्वयंसेवक यांच्यासोबत वेळ घालवावा. त्यांच्याशी काळजी आणि जिव्हाळ्याच्या गोष्टींविषयी बोलावे. सोशल मीडियाचा अत्याधिक वापर केल्याने ताण, चिंता आणि नैराश्य येते. डीजीटल मीडियावर वेळ घालवण्यापेक्षा व्यक्तींच्या संपर्कात रहा. नवीन कौशल्य शिकल्याने आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढतात. त्यामुळे मेंदुतील सकारात्मक भावनांना चालना मिळते.

पौष्टिक आहार, निसर्गाशी नाते जोडा आणि मानसिक स्वास्थ्यांशी निगडीत समस्यांना दुर्लशित करु नका.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जगताप यांनीही दररोज स्वत:साठी 15 मि. द्यायला हवीत, त्याचबरोबर चेहऱ्यावरील हास्य कायम टिकवून ठेवावे, असे सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी जीवनात, मनात उत्तम आरोग्य आणि आनंद असायला हवा. त्यासाठी मोकळेपणाने काम करा, असे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार यांनीही मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी नातेवाईक, मित्र परिवार यांच्याशी चांगले संबंध असायला हवेत, असे सांगितले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page