मुंबई- विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीतील अनेक इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 4 नोव्हेंबर शेवटची तारीख आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून बंडखोरी रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने बंडखोरांना विधानपरिषदेची आमदारकी किंवा महामंडळ देण्याचे आश्वासन दिले जात असल्याचे बोलले जात आहे.
विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या 12 जागा आहेत. महायुतीने त्यातील 7 जागा अलिकडेच भरल्या, तर 5 जागा रिक्त आहेत. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास त्या पाच पैकी एका जागेवर तुम्हाला संधी देऊ, असे बंडखोरांना सांगितले जात आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला आणि अशोक गेहलोत हे बंडखोरांशी चर्चा करत आहेत. रमेश चेन्नीथला यांच्याकडून राज्यातील 36 बंडखोरांशी व्यक्तीश फोनवर चर्चा करुन अर्ज मागे घेण्याची विनंती करण्यात आली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाला तुमच्या मदतीची गरज असून पक्ष सत्तेत आल्यावर तुम्हाला योग्य तो न्याय दिला जाईल, असे आश्वासन देखील चेन्नीथला यांच्याकडून बंडखोरांना दिले जात आहे.
पक्षश्रेष्ठींकडून बंडखोरांची मनधरणी…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील बंडखोरांशी संजय राऊत चर्चा करत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील बंडखोरांना थंड करण्यासाठी शरद पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे. या तिन्ही पक्षांकडून बंडखोरांना विधारपरिषदेची आमदारकी आणि महामंडळ देण्याचे आश्वासन दिले जात असल्याचे म्हटले जात आहे. परंतु बंडखोरांची समजूत काढण्यात पक्षश्रेष्ठींना किती यश मिळते, हे 4 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल.
बंडखोरांमध्ये संघ परिवार आणि भाजप निष्ठावंतांचा समावेश..
महायुतीच्या बंडोबांना थंड करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे. बंडखोरांमध्ये संघ परिवार आणि भाजपशी निष्ठावंत असलेल्या अनेक जुन्या नेत्यांचा समावेश आहे. देवेद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे बंडखोरांशी फोनवर चर्चा करत आहेत. तर काही बंडखोरांना चर्चेसाठी मुंबईत बोलावण्यात आले आहे.
या मतदारसंघात बंडखोरांचे आव्हान-
गोपाळ शेट्टी (भाजप), बोरिवली
अतुल शहा (भाजप), मुंबादेवी
दिनेश पांचाळ (भाजप), अणुशक्ती नगर
मधु चव्हाण (काँग्रेस), भायखळा
राजू पेडणेकर (ठाकरे गट), वर्सोवा
स्वीकृती शर्मा (शिंदे गट), अंधेरी पूर्व
मोहसीन हैदर (काँग्रेस),अंधेरी पश्चिम
राजू पारवे (शिंदे गट), उमरेड
नाना काटे (अजित पवार गट),चिंचवड
नवाब मलिक (अजित पवार गट), मानखुर्द
दिलीप माने (काँग्रेस), सोलापूर दक्षिण