महाड :- मुंबई – गोवा महामार्गावर महाड नजीक सावित्री पुलाजवळ एका खासगी प्रवासी बसचा टायर फुटून लागलेल्या भीषण आगीत ही बस पूर्णपणे जळून खाक झाली असून प्रवाशांना वेळीच बाहेर काढण्यात आल्याने कोणतीही जीवितहानी घडली नाही.
रत्नागिरी येथील हरिश्चंद्र चव्हाण यांच्या मालकीची औदुंबर छाया ट्रॅव्हल्स ही कंपनी असून या कंपनीने गौरव चव्हाण यांच्या मालकीची भाडेतत्त्वावर घेतलेली एक प्रवासी बस ( एम एच ०८ ई ९७७९ )रत्नागिरी येथून मुंबईकडे निघाली होती. या बस मध्ये १९ प्रवासी तर चालकासह कंपनीचे तीन कर्मचारी असे एकूण २२ जण प्रवास करत होते. आज पहाटे अडीचच्या सुमारास महाडच्या सावित्री पुलाजवळ ही बस आली असता तिच्या उजव्या बाजूचा मागील टायर फुटून टायरने अचानक पेट घेतला.
टायरने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या डाव्या बाजूस उभी करून प्रवाशांना झटपट खाली उतरवले तसेच बसमधील अग्निशमन यंत्रणेमार्फत आग विझवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला परंतु आगीचा जोर जास्त असल्या कारणाने आग पसरली व संपूर्ण बस आगीच्या कचाट्यात सापडली.
या घटनेची माहिती मिळताच काही वेळातच महाड एमआयडीसी अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. प्रवाशांना वेळीच खाली उतरवल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली मात्र या आगीमध्ये बस संपूर्णपणे जळून खाक झाली.
दरम्यान या बसमधील सर्व प्रवाशांना अन्य एका बसमधून सुखरूपरित्या मुंबई येथे रवाना करण्यात आले. या संपूर्ण घटनेची माहिती बसचे चालक गुलहसन पठाण यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांमार्फत अधिक तपास सुरू आहे.
जाहिरात