मुंबई- ड्युटी संपवून घरी जात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी भांडुप आणि नाहूर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान घडली. याबाबत कुर्ला लोहमार्ग पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. अमित ज्ञानेश्वर गोंदके असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
बुधवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. प्रत्येक स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झाली होती. प्रचंड गर्दीतून घराकडे जात असताना दरवाजात लटकल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र अमित कोंडके हे रात्रभर रेल्वे रुळाजवळच गंभीर जखमी अवस्थेत पडून राहिले. अमित गोंदके अंधेरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत होते. बुधवारी रात्री आपली ड्युटी संपवून लोकलने डोंबिवलीकडे जात होते. मात्र भांडूप व नाहूर दरम्यान लोकलमधून पडल्याने ते गंभीर जखमी झाले. रात्री मदत मिळू न शकल्याने गोंदके रात्रभर रेल्वे रुळावरच जखमी अवस्थेत पडून राहिले. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
अमित गोंदके हे अंधेरी लोहमार्ग पोलीस ठाण्यातील आपली ड्युटी संपल्यानंतर ते डोंबिवलीतील आपल्या घरी परतत होते. घाटकोपरपर्यंत मेट्रोने प्रवास करून पुढे त्यांनी घाटकोपरवरून डोंबिवलीकडे जाणारी लोकल पकडली. मात्र भांडुपच्या पुढे गेल्यानंतर लोकलच्या दरवाजातून पडून ते गंभीर जखमी झाले. रेल्वेतून रुळावर पडल्यामळे त्यांचा एक हात खांद्यापासूनच तुटून वेगळा झाला होता. तसेच डोक्याची कवटी फुटून गंभीर इजा झाली होती. तसेच शरीराला मोठ्या प्रमाणात खरचटले होते. रेल्वे रुळावर पोलीस गणवेशात कोणी तरी पडल्याचे आढळून आले. त्यांच्या ओळखपत्रावरून ते पोलीस कॉन्स्टेबल १४६२ अमित ज्ञानेश्वर गोंदके (मुंबई लोहमार्ग पोलीस) असल्याचे समोर आले. मुसळधार पावसामुळे रेल्वे उशिरा असल्यामुळे प्रचंड गर्दीतील जलद लोकल मधून पडून हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.