सावर्डे- सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डेच्या सह्याद्री कला महाविद्यालयातील शिल्पकलेच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या वार्षिक कला प्रदर्शनानिमित्त सलग पंधरा दिवसांच्या मेहनतीतून भव्य वीस फुटी नटराजाची प्रतिमा वार्षिक कला प्रदर्शन स्थळी उभारली आहे. ही प्रतिमा पाहून प्रदर्शनाला भेट देणाऱ्या कला रसिकांनी सह्याद्री कला महाविद्यालयातील युवा कलाकारांचे अभिनंदन करून त्यांच्या कलेचे कौतुक केले आहे.
शिवाने प्रथम आपल्या तांडवातून नृत्याचा प्रारंभ केला अशी भारतीय परंपरेतील धारण आहे. त्याच जोडीने संगीत शास्त्राचा उगम ही भगवान शिवाच्या डमरू वादनातून झाला असे मानले जाते. या शिवमूर्तीला चार हात असून त्याच्या चारही बाजू या अग्नीने वेढलेल्या आहेत एका पायाखाली अपस्मार राक्षसाला दाबून ठेवलेले असून दुसरा पाय नृत्य मुद्रेत व वर उचललेला आहे त्याच्या हातातील डमरू हे सूजनाचे प्रतीक तर अग्नी हे विनाशाचे प्रतीक मानले जाते या संसाराला आश्रय देण्याचे सामर्थ्य या मूर्तीतून दिसून येते. अज्ञान आणि दृष्ट प्रवृत्ती यावर पाय रोवून शिवनृत्य करीत आहे अशी ही प्रतीकात्मकता यात दिसून येते. चूळ राजवटीतील तांब्याची नटराज प्रतिमा ही इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातील आहे असे मानले जात असून त्यामध्ये शिवाची अभय मुद्रा आहे.
सह्याद्री कला महाविद्यालयातील शिल्प व प्रतिमान बंधकला हा विषय शिकवणारे प्राध्यापक रुपेश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा कलाकारांनी नटराजाचे हे भव्य शिल्प साकारले आहे. वार्षिक कला प्रदर्शनानिमित्त सह्याद्री कला महाविद्यालयातील विद्यार्थी दरवर्षी प्रदर्शनस्थळी कलेशी निगडित असणारे विषय भव्य दिव्य स्वरूपात साकारत असतात. यावर्षी शिल्पकलेच्या विद्यार्थ्यांनी नटराजाचे उभारलेले वीस फूट उंचीचे भव्य शिल्प, म्हणजे युवा कलाकारांमधील कमालीची मेहनत , कल्पकता आणि जिद्दीचे प्रतीक असल्याचे मत कला महाविद्यालयाचे चेअरमन ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के, प्राचार्य माणिक शिवाजी यादव यांनी व्यक्त केले आहे. हे शिल्प पाहण्यास मिळणे ही वार्षिक कला प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या कलारसिकांसाठी पर्वणीच ठरत आहे.