गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र राजकीय हत्त्या आणि हल्ल्यांनी ढवळून निघाला आहे. काही दिवसांपूर्वी भाजप नेत्याने पोलीस स्टेशनमध्येच एकावर गोळीबार केला होता. तर फेसबुक लाईव्ह दरम्यान एका ठाकरे गटाच्या नेत्याची हत्या करण्यात आलीये. त्यानंतर आज झालेल्या मृत्यूमुळे त्यात भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात गुंडा राज सुरु झालंय का अशी चर्चा सुरु झाली आहे.
जळगाव- चाळीसगावमधील भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तीन दिवसाआधी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. माहितीनुसार त्यांच्यावर सात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास महेंद्र मोरे यांनी अखेरचा श्वास घेतला.
तीन दिवसांपूर्वी बाळू मोरे यांच्यावर सात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर नाशिकमधील अशोका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते, मात्र सुरुवातीपासून त्यांची प्रकृती नाजूक बनली होती. आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
चाळीस गावमधील स्टेशनरोड भागात बाळू मोरे राहायचे. अपक्ष आणि भाजपच्या तिकीटावर ते नगरसेवक राहिले आहेत. याप्रकरणात एक सीसीटीव्ही फूटेज समोर आला होता. यात काही हल्लेखोर तोंड झाकून येत असताना दिसत आहेत. हल्ला कशामुळे झाला याचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. यामागे काही राजकीय कारण आहे का? याचा पोलीस तपास करत आहेत. मात्र, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
जाहिरात
जाहिरात
जाहिरात