भाजप नेते संतोष गांगण यांची घणाघाती टीका.
जनशक्तीचा दबाव न्यूज | राजापूर | फेब्रुवारी ०७, २०२३.
मौजे रायपाटण, ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथील प्रस्तावित तालुका क्रीडा संकुलास सन २०११ मध्ये मंजुरी मिळाली. सदर क्रीडा संकुलास शासनाने जमीन अधिग्रहण करून क्रीडा मंत्रालयाने २८ मार्च २०१३ ला प्रशासकीय मान्यता दिली होती. कामाच्या तांत्रिक तपशीलानुसार पुरेसा निधी नसल्याने निविदेला त्यावेळी योग्य प्रतिसाद मिळाला नाही. स्थानिक आमदार डॉ. राजन साळवी हे स्वतः राजापूर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष असून मागील ११ वर्षांपासून, त्यातील आताची अडीच वर्षे मविआ सरकारमध्ये व त्यामागील ५ वर्षे युतीच्या सरकारमध्ये सहभागी असतानाही सदर क्रीडा संकुलाच्या बांधकामासंदर्भात भरीव योगदान देऊ शकले नाहीत.
“आता याबाबत भाजपा कार्यकर्त्यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली तेव्हा यांना जाग आली. निव्वळ भाजप सरकारने केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा अत्यंत केविलवाणा प्रयत्न आता त्यांच्याकडून सुरु आहे” अशा प्रकारे खरमरीत शब्दांत भाजपा नेते संतोष गांगण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “केवळ तालुकास्तरावर बैठका व पाठपुरावा करून अशा प्रकारचे विषय विषय सुटत नसतात, त्यासाठी मंत्रालयस्तरावर सातत्याने पाठपुरावा करावा लागतो एवढीही जाण एका विधानसभा सदस्याला नसेल तर हे मतदारसंघातील मायबाप मतदारांचे दुर्दैवच म्हणावे लागेल.” असे म्हणत श्री. गांगण यांनी आमदार साळवींवर निशाणा साधला.
जवळपास दीड वर्षांपूर्वी पाचल जि.प. शाळा क्र. १ च्या शेजारी सदर क्रीडासंकुल बांधण्यासाठी स्वतः जमिनीची पाहणी करून आमदारांनी संबंधित विभागाकडे तशी मागणी केली, तसेच आमदारांच्या निर्देशानुसार शिवसेनेच्या अधिपत्याखाली असलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या २४ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते तसा ठरावही मंजूर करण्यात आला होता. तसेच प्रत्यक्ष जमीन पहाणीच्या फोटोंसहित वर्तमानपत्रे व सामाजिक माध्यमांवर बातम्यासुद्धा प्रसिद्ध केल्या होत्या. यामाध्यमातून आमदार साहेबांनी केवळ स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी पाचल पंचक्रोशीतील शिवसेना कार्यकर्त्यांना खूष करून दोन गावांत कमालीचे मतभेद निर्माण करण्याचे काम मात्र निश्चित केलं.
त्यामुळे “रायपाटण येथील क्रीडासंकुलासाठी पाठपुरावा करीत होतो” असे आमदारांचे वक्तव्य हास्यास्पद असून स्वतःच्या मनाचे समाधान करण्यासाठी नागरिकांची दिशाभूल करणारे आहे. मागील दोन वर्षे मी व माझे सहकारी भाजप कार्यकर्ते याच क्रीडा संकुलासाठी जिल्हा क्रीडा विभाग व मंत्रालयस्तरावर सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. ग्रा.पं. रायपाटणचे विद्यमान सरपंच मा. श्री. महेंद्र गांगण, माजी सरपंच मा. श्री. संदीप कोलते, श्री. राजेशजी नलावडे यांनी जिल्हा क्रीडा विभागात प्रशासन स्तरावर रीतसर याबाबत पाठपुरावा केला आहे. सह्याद्री परिसर शिक्षण प्रसारक मंडळाच्या जमीनीच्या तांत्रिक अडचणीचा विषय भाजप तालुका उपाध्यक्ष श्री. मनोज गांगण यांनी अतिशय कौशल्याने हाताळून यशस्वीरित्या सोडवीला. त्याला सदर संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. मनोहरजी खापणे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सहकार्य केलं.
“मागील सरकारमध्ये सदर विषयासंदर्भात माझे मित्र श्री. अजित यशवंतराव यांनी तत्कालीन क्रीडा राज्यमंत्री मा. अदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून मात्र निश्चित प्रयत्न केले आहेत याची माहितीही यानिमित्ताने देतो.” असे ते म्हणाले. राज्याच्या तालुका क्रीडासंकुल सुधारीत शासन निर्णयानुसार बांधकामासाठी पाच कोटी रुपये निधीची मर्यादा आहे. त्यानुसार सा.बां. विभागाकडून अंदाजपत्र बनविणे तसेच राज्य क्रीडा समितीकडून तांत्रिक व मंत्रायातून प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी मी स्वतः लेखी व प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा करीत आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या राज्यस्तरीय दिशा समितीचे उपाध्यक्ष स्वतः क्रीडा मंत्री मा. गिरीश महाजन साहेब असून त्या समितीचा मी सदस्य आहे. त्यामुळे मंत्रीमहोदयांकडून सदर कामासंदर्भात भरीव सहकार्य लाभले आहे हे मी नमूद करतो.
सदर क्रीडा संकुलाचे रू. ४९८.३० लक्ष अंदाजपत्रक असून जिल्हा क्रीडा विभागाकडे फक्त रू १०२.४८ लक्ष निधीची उपलब्धता असून उर्वरित निधीसाठी आमदार मा. श्री. प्रसाद लाड यांनी राज्याचे क्रीडामंत्री व आमदार श्री. कालिदास कोळंबकर यांनातसेच मा. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून व प्रत्यक्ष भेटून यशस्वी प्रयत्न केला आहे. यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून रायपाटणचे सुपुत्र श्री. कोलते स्वतः पाठपुरावा करीत आहेत. त्यामुळे भाजप सरकारच्या माध्यमातून क्रीडासंकुलाच्या बांकामाला लवकरच सुरुवात होईल असे मी ठामपणे सांगतो. अशी माहिती श्री. संतोष गांगण यांनी दिली.