जनशक्तीचा दबाव न्यूज | बुलढाणा | फेब्रुवारी ०२, २०२३.
बुलढाणा जिल्ह्यात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने वर्गाच्या खोलीतील सीलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. प्रेम प्रकरणातून या विद्यार्थ्याने आयुष्य संपवल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याच्या मृतदेहाच्या शेजारी सुसाईड नोट देखील आढळली. ज्यात ‘एक मुलगी माझ्याशी न बोलता इतर मुलांशी बोलते’ असा उल्लेख करण्यात आला आहे. विद्यार्थ्याच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे.
बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील एका महाविद्यालयात ही घटना घडली आहे. सूरज रामकृष्ण गावंडे अस आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव असून तो जळगाव जामोद तालुक्यातील येणंगाव येथील रहिवासी होता. वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या वर्ग खोलीतच सीलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. काल बुधवारी संध्याकाळी ही घटना सुरक्षारक्षकाच्या लक्षात आली. त्याने तातडीने महाविद्यालयाच्या प्राचार्यांना तसंच पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली.
यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करुन विद्यार्थ्याच्या मृतदेहाच्या शेजारुन सुसाईड नोट हस्तगत केली. एक मुलगी माझ्याशी न बोलता इतर मुलांशी बोलते.. असा उल्लेख या नोटमध्ये केलेला आहे. त्यामुळे प्रेम प्रकरणातून आलेल्या नैराश्यामुळे या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं असावं, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करुन चौकशी सुरु केली आहे.