संगमेश्वर : राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल्या कामातील दगड फोडण्यासाठी बोअरवेल ब्लास्टिंगचा वापर केला जात आहे.त्यामुळे परिसरातील अनेक घरांना तडे गेल्याच्या तक्रारी संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा-मानसकोंड ग्रामस्थांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केल्या हाेत्या. याची नोंद घेऊन जिल्हाधिकारी यांनी ब्लास्टिंग तत्काळ बंद करा, असे आदेश दिले आहेत. तसेच ज्या घरांना तडे गेले आहेत, त्यांना भरपाई द्या, असेही सांगितले आहे.
कुरधुंडा (ता. संगमेश्वर) गावातील राष्ट्रीय महामार्गावरील बोअरवेल ब्लास्टिंगला ग्रामपंचायतीने विरोध करूनही ते बंद करण्यात आले नव्हते. एका वेळी २५ ते ३० पेक्षा जास्त होल अडीचशे फुटांपेक्षा खोल मारून त्या ठिकाणी बोअरवेल ब्लास्टिंग केले जात होते. याचा फटका ग्रामस्थांना बसला असून, गावातील अनेक घरांना तडेही गेले आहेत.ग्रामस्थांनी या विरोधात आवाज उठवत पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रार केली हाेती. त्याची दखल घेत पालकमंत्री सामंत यांनी या भागाची पाहणी केली. प्रत्यक्षात लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. यासंदर्भात तातडीने बैठक घेऊन त्यावर जिल्हाधिकारी यांना कारवाई करण्याचे आदेश दिले हाेते.