
चिपळूण | प्रतिनिधी : चिपळूण तालुक्याच्या पूर्व भागातील सावर्डे, असुर्डे, वहाळ, कोंडमाळा, आंबतखोल, कोकरे, पालवण परिसराला आज दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सुमारे तासभर मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अगोदरच दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या शेतकऱ्यांवर भात कापणीच्या तोंडावर आलेल्या या पावसामुळे “दुष्काळात तेरावा महिना” अशी अवस्था निर्माण झाली आहे.
मागील काही दिवसांपासून चिपळूण तालुक्यात ढगाळ वातावरण होते. हवामान खात्याने हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला होता, मात्र आज दुपारी अचानक वातावरणात बदल झाला. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला हलका वाटणारा पाऊस काही वेळातच जोरदार झाला. सावर्डे, असुर्डे, वहाळ या तिन्ही गावांच्या परिसरात जवळपास एक तासाहून अधिक काळ धो-धो पाऊस कोसळला.
भातशेतीचे मोठे नुकसान..
सध्या भात कापणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. अनेक शेतकऱ्यांनी भात कापून शेतातच पेंढ्या रचून ठेवल्या होत्या, तर काही ठिकाणी भात कापणी सुरू होती. अचानक आलेल्या या पावसामुळे कापून ठेवलेले भात भिजून गेले. शेतात पाणी साचल्याने भाताच्या पेंढ्या वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. तर शेतात उभे असलेले भात पीक जोरदार वाऱ्यामुळे आणि पावसामुळे आडवे झाले आहे. यामुळे भाताच्या दाण्यांना मोड येण्याची आणि उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, तासभर झालेल्या या जोरदार पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांची एकच धावपळ उडाली. शेतात काम करणारे शेतकरी भिजतच घरी परतले. बाजारात आलेल्या नागरिकांनी पावसापासून बचाव करण्यासाठी दुकानांच्या आडोशाचा आधार घेतला.
शेतकऱ्यांची व्यथा..
सावर्डे येथील शेतकरी रामचंद्र कदम म्हणाले, “गेल्या वर्षीही अवकाळीने आम्हाला रडवले, यंदा पावसाने दगा दिल्याने दुष्काळ जाहीर झाला. कसबसे भात पीक हाताशी आले होते, कापणी सुरू केली होती. पण आजच्या पावसाने सर्व मेहनत पाण्यात घातली. कापलेले भात भिजले, आता ते सुकवायचे कसे, हा मोठा प्रश्न आहे.”
असुर्डे, कोकरे, पालवण भागातील शेतकऱ्यांची तीच व्यथा आहे. दुष्काळामुळे आधीच पाण्याअभावी भात पीक करपले होते, त्यात उरलेसुरले पीक हाताशी येत असताना या पावसाने पुन्हा फटका बसला आहे.
वाहतुकीस अडथळा, वीज पुरवठा खंडित..
जोरदार पावसामुळे सावर्डे – चिपळूण मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत आणि झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागली. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहने बंद पडल्याच्या घटना घडल्या.
तसेच, विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. सुमारे दोन तास सावर्डे, कोंडमाळा, आंबतखोल परिसरातील वीज गायब होती. यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*