नवव्या पिढीकडून आंग्रे घराण्याचा शस्त्रपूजनाचा ऐतिहासिक वारसा जतन!…

Spread the love

साडेतीनशे वर्षांची परंपरा आजही कायम; सरखेल रघुजीराजे आंग्रे यांच्या हस्ते विजयादशमीला पारंपरिक शस्त्रपूजन..

*रायगड | जनशक्तीचा दबाव न्यूज-* मराठा आरमाराच्या देदीप्यमान इतिहासाची साक्ष देणाऱ्या सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या घराण्यातील विजयादशमी आणि शस्त्रपूजनाची साडेतीनशे वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही श्रद्धेने जपली जात आहे. आंग्रे घराण्याच्या नवव्या पिढीतील वंशज सरखेल रघुजीराजे आंग्रे यांनी घेरिया येथील निवासस्थानी पारंपरिक पद्धतीने शस्त्रपूजन केले. या सोहळ्यात ऐतिहासिक शस्त्रांचे पूजन करून पूर्वजांच्या पराक्रमाला आणि मराठा आरमाराच्या गौरवशाली इतिहासाला अभिवादन करण्यात आले.

*ऐतिहासिक शस्त्रांच्या पूजनाने जागवला पराक्रमाचा वारसा*

विजयादशमीच्या निमित्ताने आयोजित या पूजनात सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या काळातील विविध ऐतिहासिक शस्त्रांचा समावेश होता. धोप, तलवारी, दांडपट्टे, गुर्ज, कट्यारी, भाले, जांबिये, परशू, गुप्त्या आणि ढाली अशा शस्त्रांचे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले. याशिवाय व्यायामासाठी वापरल्या जाणाऱ्या मुद्गलांसह परवाना प्राप्त आधुनिक अग्निशस्त्रांचेही पूजन करण्यात आले.

या वेळी रघुजीराजे आंग्रे यांच्या पत्नी, चिरंजीव आर्यमान व जयार्जुन आणि कन्या गायत्री उपस्थित होते. सायंकाळी सीमोल्लंघन आणि सोने लुटण्याचा पारंपरिक कार्यक्रमही पार पडला.

*‘तोफ’ तलवार ठरली विशेष आकर्षण..*

या शस्त्रपूजन सोहळ्यात सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या युद्धातील वापरातील ‘तोफ’ नावाची तलवार विशेष आकर्षण ठरली. दमास्कस पोलादापासून तयार करण्यात आलेल्या या तलवारीचे वजन सुमारे पाच किलो ३०० ग्रॅम, तर लांबी ४० इंच असल्याचे सांगितले जाते. सोन्याची मूठ असलेल्या औपचारिक तलवारीचाही या परंपरेत समावेश आहे.

ही ऐतिहासिक शस्त्रे केवळ युद्धसामग्री नसून मराठा आरमाराच्या सामर्थ्याची, शौर्याची आणि ऐतिहासिक परंपरेची आठवण करून देणारा अनमोल ठेवा आहेत.

*मराठा आरमाराच्या इतिहासातील आंग्रे घराण्याचे योगदान…*

सरखेल कान्होजी आंग्रे यांनी मराठा आरमाराच्या उभारणीत आणि सागरी सामर्थ्य वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्यासह सेखोजी, संभाजी आणि तुळाजी आंग्रे यांनीही मराठा आरमाराच्या इतिहासात मोलाचे योगदान दिले. आंग्रे घराण्याचा हा इतिहास महाराष्ट्राच्या सागरी परंपरेतील महत्त्वाचा अध्याय मानला जातो.

*पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचतोय सांस्कृतिक वारसा..*

विजयादशमीला शस्त्रपूजन करण्याची परंपरा जतन करण्यामागे पूर्वजांचा पराक्रम, मराठा आरमाराचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याची भावना असल्याचे रघुजीराजे आंग्रे यांनी सांगितले.

आधुनिक काळातही ऐतिहासिक परंपरांचे जतन करून त्या नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरत आहे. आंग्रे घराण्याची शस्त्रपूजन परंपरा म्हणजे इतिहासाविषयीची निष्ठा, पूर्वजांच्या स्मृतींचे जतन आणि मराठ्यांच्या सागरी शौर्याचा अभिमान जपणारा वारसा होय.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

**जनशक्तीचा दबाव न्यूज**
*दबाव जनशक्तीचा, निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page