कोकण रेल्वे मार्गावर आठवड्यातून सहा वेळा धावणारी ‘वंदे भारत’ आता फक्त तीनच दिवस धावणार …

Spread the love

मुंबई : आताच्या घडीला भारतीय रेल्वेची सर्वांत लोकप्रिय ट्रेन म्हणजे ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस. देशातील अनेक मार्गांवर या ट्रेनची सेवा सुरू आहे. प्रवाशांचा या ट्रेनला प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून काही मार्गांवरील ‘वंदे भारत’ ट्रेनच्या डब्यांची संख्याही वाढवण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. परंतु, पावसाळ्यात कोकणासह गोव्याचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी जाण्याचा प्लान करत असलेल्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई ते गोवा या मार्गावरील ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द होत आहेत.
      

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच सीएसएमटी (CSMT) स्थानकाहून गोव्यातील मडगाव स्थानकापर्यंत ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस नियमितपणे चालवली जाते. परंतु, आता कोकण रेल्वे मार्गावरील मान्सून वेळापत्रकामुळे मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसच्या अप आणि डाऊन फेऱ्या कमी करण्यात येणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर १५ जून ते २० ऑक्टोबर या कालावधीत मान्सून वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. या कालावधीत रेल्वेगाड्यांचा वेग मंदावतो. बहुतांश रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल होतो. याचा सर्वाधिक फटका अतिजलद ट्रेनना बसतो. वंदे भारत एक्स्प्रेसलाही कोकण रेल्वेवरील मान्सून वेळापत्रकाचा फटका बसला आहे. आठवड्यातून सहा वेळा धावणारी वंदे भारत आता मान्सून वेळापत्रकानुसार फक्त तीन दिवस धावेल.
        

कोकण रेल्वेच्या मान्सून वेळापत्रकामुळे जून ते ऑक्टोबर या कालावधीत मुंबई ते गोवा वंदे भारतच्या शंभरहून अधिक फेऱ्या रद्द होतील. कोकणात जाणाऱ्यांची संख्या गणेशोत्सव काळात सर्वाधिक असते. तसेच पावसाळ्यात मुंबई ते गोवा दरम्यानचे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक वंदे भारतचा प्रवास निवडतात. धो-धो पाऊस पडत असताना, दृश्यमानता कमी होते. यासाठी लोको कोकण मार्गावरील ट्रेनच्या लोको पायलट यांनाही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

*मुंबई ते गोवा वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचे मान्सून वेळापत्रक कसे असेल?*

कोकण रेल्वेच्या मान्सून वेळापत्रकानुसार, जून ते ऑक्टोबर या कालावधीत मुंबई ते गोवा मार्गावरील वंदे भारत ट्रेन आता आठवड्यातील तीन दिवस चालवली जाणार आहे. गाडी क्रमांक २२२२९ सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी पहाटे ५.२५ वाजता सीएसएमटीवरून सुटेल आणि मडगाव येथे दुपारी ३.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक २२२३० मडगाववरून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी दुपारी १२.२० वाजता सुटेल आणि रात्री १०.२५ वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page